धनदांडग्या ८०२ ग्राहकांकडे १८ कोटींचे वीज बिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:42+5:302021-02-10T04:33:42+5:30
बीड : जिल्ह्यात ‘महावितरण’ची थकबाकी बुडविणाऱ्यांमध्ये ८०२ धनदांडग्या ग्राहकांचा समावेश आहे. त्यात बीड विभागातील ४४० तर अंबाजोेगाई विभागातील ३६२ ...
बीड : जिल्ह्यात ‘महावितरण’ची थकबाकी बुडविणाऱ्यांमध्ये ८०२ धनदांडग्या ग्राहकांचा समावेश आहे. त्यात बीड विभागातील ४४० तर अंबाजोेगाई विभागातील ३६२ घरगुती, औद्यागिक, व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे १८ कोटी २ लाखांची थकबाकी आहे.
मार्च अखेरमुळे सध्या सर्व कार्यालये थकबाकी वसुली करण्यात व्यस्त आहेत. त्यात महावितरण, नगरपालिका, नगरपंचायत यांची शासकीय कार्यालये आणि नागरिकांकडे कर व देयकाच्या स्वरूपात करोडोंची थकबाकी आहे. यात या विभागाकडून आता धनदांडग्या ग्राहकांची यादी काढणे सुरू झाले आहे. ‘महावितरण’मध्ये १ लाख रुपयांच्या पुढे वीजबिल बाकी असणारे तब्बल ८०२ ग्राहक आहेत. त्यांना वारंवार सूचना करूनही वीज बिल भरण्यास पुढे येत नाहीत. असे असतानाही या विभागाकडून त्यांना केवळ नोटिसांचा पाहुणचार केला जातो. जशी सामान्यांवर कारवाई केली जाते किंवा त्यांना तंबी दिली जाते, अशीच धनदांडग्या ग्राहकांनाही देण्याची गरज आहे. जे ग्राहक वारंवार नोटीस बजावूनही आणि सूचना करूनही वीज बिल भरत नाहीत, अशांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परळी, बीडमध्ये सार्वाधिक ग्राहक
१ लाखाच्या पुढे थकबाकी असणारे ग्राहक हे बीड व परळीमध्ये सर्वाधिक आहेत. परळीतील २१० ग्राहकांकडे ५ कोटी ३५ लाख तर बीडमधील ३०१ ग्राहकांकडे ६ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे.
घरगुती ग्राहकांकडे जास्त थकबाकी
घरगुती वीज जोडणी असतानाही तब्बल ४६८ ग्राहकांकडे १ लाखांच्या पुढे थकबाकी आहे. अशा ४६८ ग्राहकांकडे ९ कोटी ३० लाख रुपये थकले आहेत. औद्याेगिकच्या १८१ ग्राहकांकडे ५ कोटी ४० लाख तर व्यावसायिक १५३ ग्राहकांकडे ३ कोटी ३१ लाखांची थकबाकी आहे.
कोट
१ लाखाच्या पुढे थकबाकी असणाऱ्यांची यादी तयार केली आहे. या सर्वांकडून वीज बिल वसूल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
रवींद्र कोळप
अधीक्षक अभियंता, महावितरण बीड
---
अशी आहे आकडेवारी
बीड विभाग
घरगुती ग्राहक २७७ - थकबाकी ४ कोटी ९४ लाख
व्यावसायिक ग्राहक ६४ - थकबाकी १ कोटी ६३ लाख
औद्याेगिक ग्राहक ९९ - थकबाकी २ कोटी ९१ लाख
----
अंबाजोगाई विभाग
घरगुती ग्राहक १९१ - थकबाकी ४ कोटी ३६ लाख
व्यावसायिक ग्राहक ८९ - थकबाकी १ कोटी ६८ लाख
औद्याेगिक ग्राहक ८२ - थकबाकी २ कोटी ४८ लाख
---
एकूण ग्राहक ८०२ - थकबाकी १८ कोटी २ लाख