जप्त केलेला १९ लाखांचा गुटखा जाळून नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:17 AM2020-01-10T00:17:59+5:302020-01-10T00:18:34+5:30
सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कासारी गावाजवळ एका टेम्पोमधून जप्त केलेला १९ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात जाळून नष्ट करण्यात आला.
आष्टी : सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कासारी गावाजवळ एका टेम्पोमधून जप्त केलेला १९ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात जाळून नष्ट करण्यात आला.
उस्मानाबाद येथून नगरकडे हिरव्या रंगाच्या टेम्पोमधून (एमएच-०४ एफयू-४४५०) अवैधरित्या गुटख्याची वाहतून होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी सापळा लावून व पाठलाग करून कासारी परिसरात ७ जून रोजी सदर टेम्पो पकडून चालकाला ताब्यात घेतले होते. टेम्पोमधील ४० पोत्यांमध्ये अंदाजे १८ लाख ३६ हजार रु पयांचा गुटखा, टेम्पो असा ४० लाख रु पये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी टेम्पोचालक कालिदास देवीदास भोसले (रा. बावची, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) विरुध्द आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी जप्त केलेल्या या गुटख्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचे कृष्णा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ऋ षिकेश मरेवाड, अनिकेत भिसे यांनी पंचनामा करुन कारवाई केल्यानंतर गुरुवारी नगरपंचायतीच्या डोईठाण रस्त्यावरील कचरा डेपोजवळ जाळून विल्हेवाट लावली. यावेळी सुमित कारंजकर, अजित शिकेतोड, मिलिंद निकाळजे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.