3.5 लाख महिलांच्या खात्यात टाकणार 195 कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:50 AM2023-08-10T06:50:07+5:302023-08-10T06:50:18+5:30
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे शनिवारी उद्घाटन; एकाच दिवशी होणार जमा
- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दुसरा टप्पा १२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यात पहिल्या अपत्याला पाच हजार व दुसरी मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील ३ लाख ५८ हजार गर्भवती व माता पात्र आहेत. यांच्या खात्यावर शनिवारी एकाच वेळी पाच व सहा हजार याप्रमाणे १९५ कोटी ८० लाख रुपये जमा होणार आहेत.
या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी पाच हजार रुपये दिले जात होते. गर्भवती असताना ३ व बाळ जन्मल्यानंतर पहिल्या लसीकरणावेळी २ असे पाच हजार वितरित केले जात. आता दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.
लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अडचण आल्यास आशाताई, एएनएम यांच्याशी संपर्क साधावा.
- डॉ. संजय कदम, जिल्हा प्रजनन
व बाल आरोग्य अधिकारी, बीड
लाभ कोणाला मिळणार?
पहिले अपत्य आहे, अशांना ५ हजार रुपये. एप्रिल २०२२ नंतर दुसरी मुलगी आहे, अशांना ६ हजार रुपये.
अर्ज भरण्यास अडचणी
n आशाताईंकडे मोबाइल नाहीत. याचे पोर्टल मध्येच बंद पडत आहे.
n अर्ज सबमिट करताना कागदपत्रे घेत नाही. यात सुधारणा व मुदतवाढ करावी.
अर्जासाठी २ दिवस शिल्लक
१२ ऑगस्ट रोजी योजनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. राज्यातील सर्व विभाग समन्वयकांची ऑनलाइन बैठकही बुधवारी झाली. जास्तीत जास्त अर्ज भरण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
असे आहे उद्दिष्ट लाभार्थी एकूण रक्कम
पहिले अपत्य असणारे १.९६ लाख ९८ कोटी (५ हजार प्रमाणे)
दुसरी मुलगी असणारे १.६३ लाख ९७.८० कोटी (६ हजार प्रमाणे)