पोटगीचा अडीच वर्षांचा संघर्ष, ४ तासांत न्यायालयाने संपवला; पतीस सुनावली कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:54 PM2022-12-08T19:54:04+5:302022-12-08T19:54:28+5:30
वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे.
बीड : लग्नानंतर एकमेकांचे पटत नसल्याने रीतसर फारकत घेतलेल्या पतीने पत्नीला महिन्याकाठी २७०० रुपये पोटगी दिली नाही, त्यामुळे पत्नीने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्यास उचलले व न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची तब्बल ६२ दिवसांसाठी कारागृहात रवानगी केली. ६ डिसेंबरला कौटुंबिक न्यायालयाचे न्या. मकरंद अदवंत यांनी हे आदेश दिले.
शेख शारेब शेख सादेक (वय ३१, रा. शहेंशाहनगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. व्यवसायाने मेेकॅनिक असलेल्या शेख शारेब याने पत्नी निखत फातेमाशी फारकत घेतली होती. निखत फातेमा या कमावत्या नव्हत्या. गुजराण करण्यासाठी महिन्याकाठी शेख शारेब याने २७०० रुपये पोटगी द्यावी, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. मात्र, ३१ महिन्यांपासून शेख शारेब हा पोटगी देत नव्हता. एकूण ८४ हजार ५०० रुपये त्याच्याकडे थकीत आहेत. दरम्यान, पोटगी मिळावी, यासाठी निखत फातेमा यांनी कौटुंबिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
या दरम्यान, वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे. त्यामुळे ६ डिसेंबरला न्या. मकरंद अदवंत यांनी त्याच्याविरुध्द अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, निखत फातेमा या आपल्या आईसोबत ६ डिसेंबरला शिवाजीनगर ठाण्यात कैफियत घेऊन आल्या. त्यानंतर पो. नि. केतन राठोड यांनी अंमलदार आस्तीक लादेक व विकास कांदे यांना रवाना केले. या दोघांनी तपासचक्रे गतिमान करून शेख शारेब यास शहेंशाहनगरातून ताब्यात घेतले. त्यास लगेचच कौटुंबिक न्यायालयात हजर केले. न्या. मकरंद अदवंत यांनी त्यास ६२ दिवस कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
अडीच वर्षांचा संघर्ष, चार तासांत न्याय
शेख शारेब हा अडीच वर्षांपासून पत्नीला पोटगी देत नव्हता. न्यायालयीन नोटीस व वॉरंटकडेही तो दुर्लक्ष करत असे. ६ डिसेंबरला न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यावर निखत फातेमा या आईसमवेत पोलीस ठाण्यात आल्या. शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड यांनी त्यांची कैफियत जाणून घेत धीर देण्याचा प्रयत्न केला; त्यानंतर दोन अंमलदारांना रवाना करून न्यायालयात हजर केले. त्यामुळे अडीच वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या निखत फातेमाला अवघ्या चार तासांत न्याय मिळाला. पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे माय-लेकी केतन राठोड यांचे आभार मानायला विसरल्या नाहीत.