मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:30 AM2019-08-07T00:30:26+5:302019-08-07T00:31:28+5:30
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे.
बीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनामुळे सर्वच आडत बाजारात होणारी उलाढाल ठप्प झाली आहे.
बाजार समिती कर्मचाºयांचे २६ जुलैपासून मुंबईत आंदोलन सुरु आहे. तर कर्जत येथे पणन मंत्र्यांच्या घरासमोर कर्मचाºयांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ आॅगस्टपासून जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, परळी, अंबाजोगाई, पाटोदा आणि कडा येथील बाजार समित्यांमधील कर्मचारी सामूहिक रजा दिली आहे. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमधील दैनंदिन कामकाज तसेच आडतीवरील व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व मोंढ्यातील मिळून जवळपास पंधरा ते वीस कोटी रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहे. परिणामी यातून शासनाला मिळणारा महसूलही बुडत आहे. बाजार समिती कर्मचाºयांच्या या आंदोलनाला आडत व्यापारी आणि हमाल संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एरवी गजबजणाºया मोंढा परिसरात शुकशुकाट दिसून आला.