अंबाजोगाईत चोरटे पुन्हा सक्रीय; बँक कॉलनीत २ लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:19 PM2018-10-08T19:19:46+5:302018-10-08T19:20:56+5:30
स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत उघडकीस आली आहे.
अंबाजोगाई (बीड ) : स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत उघडकीस आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली. मागील काही दिवसांपासून शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत.
रिंग रोडवर हैदराबाद बँक कॉलनी भागात गुत्तेदार माधव मारोतीराव होळंबे यांचे घर आहे. त्यांना दोन मुले असून शनिवारी एक मुलगा बाहेरगावी गेलेला होता तर दुसरा मुलगा त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला होता. रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर होळंबे झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. होळंबे झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेत दोरीने बांधून टाकला. त्यानंतर त्यांच्या मुलाच्या खोलीत प्रवेश करत कपाटात ठेवलेले 2 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास जाग आल्यानंतर होळंबे यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मुलगा सुरज यांना फोन करून हॉस्पिटलमधून बोलावून घेतले. सुरज हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी माधव कोळंबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कलम 380, 457 अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा. फौजदार सोनेराव बोडखे करत आहेत.