बीडमध्ये ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनास २३ पैकी २० पाहुणे गैरहजर;जि.प.अध्यक्षांवर आला उद्घाटनाचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 03:18 PM2017-11-18T15:18:55+5:302017-11-18T15:20:49+5:30
बीड : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण - २०१० अंतर्गत बीडमध्ये ग्रंथोत्सव - २०१७ शुक्रवारी भरविण्यात आला. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर उद्घाटक, ...
बीड : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण - २०१० अंतर्गत बीडमध्ये ग्रंथोत्सव - २०१७ शुक्रवारी भरविण्यात आला. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थिती अशी तब्बल २३ जणांची प्रमुख नावे होती. परंतु; यापैकी केवळ एकच प्रमुख पाहणे उपस्थित होते. २० जणांनी या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनाकडे पाठ फिरविली.
ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला. उद्घाटक म्हणून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. रजनी पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे, भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, लक्ष्मण पवार, अमरसिंह पंडित, दिलीपराव देशमुख, प्रा. संगीता ठोंबरे, सतीश चव्हाण, आर. टी. देशमुख, विक्रम काळे, जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची नावे आहेत. प्रमुख उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सहा.संचालक अशोक गाडेकर, अनंतराव चाटे यांची नावे आहेत. यामध्ये केवळ जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, अशोक गाडेकर, अनंतराव चाटे या तिघांनीच उपस्थिती दर्शवली.
दरम्यान, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला चक्क मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिका-यांनीच पाठ फिरविली. पाठ फिरविण्याचे कारण जरी अस्पष्ट असले तरी कार्यक्रमस्थळी मात्र पत्रिकेवरील नावांची चवीने चर्चा सुरू होती. प्रत्येकजण तर्कवितर्क लावत होता. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिका-यांनीच ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले.एरव्ही पत्रिका न मिळाल्याचे कारण सांगणारे पत्रिका देऊनही गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
प्रत्येकाला निमंत्रण दिले
आम्ही प्रत्येकाला निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. सायंकाळच्या सुमारास आ.लक्ष्मण पवार यांनी ग्रंथोत्सवास भेट दिली.
- दि. ना. काळे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड