२० कोटींची इमारत; पण मनुष्यबळाअभावी आयपीडी बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:10+5:302021-02-26T04:47:10+5:30
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राची इमारत २० कोटी रुपये खर्च करून ...
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राची इमारत २० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली; परंतु, केवळ मनुष्यबळ नसल्याने येथे आयपीडी सुरू झालेली नाही. केवळ ओपीडीच्या सुविधा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सफाईसाठीही कर्मचारी नसल्याने शस्त्रक्रियादेखील बंद असल्याचे समोर आले आहे.
लाेखंडी सावरगाव येथे २००७ साली वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रासाठी प्रस्ताव तयार केला. त्यानंतर येथे २०१४ साली इमारत तयार झाली; परंतु केवळ मनुष्यबळ नसल्याने आणि आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे सहा वर्षे ही इमारत धूळ खात होती; परंतु २०२० साली कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हे केंद्र कोरोनासाठी राखीव ठेवले. याच काळात येथे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारीही नियुक्त केले, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येथे कोरोनाबाधित व संशयितांवर उपचार करण्यात आले; परंतु सध्या कोराेनाचे रुग्ण कमी झाल्याने इतर रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. असे असले तरी येथे केवळ ओपीडीची सुविधा आहे. एखाद्या रुग्णाला दाखल करून घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एवढा निधी खर्चूनही केवळ पदभरती न झाल्याने येथे सामान्यांना पूर्णपणे सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
८४ पदे मंजूर, पण भरती नाही
या रुग्णालयासाठी कुशल, अकुशलचे ८४ पदे मंजूर आहेत. यात सफाई कामगार, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे; परंतु अद्यापपर्यंत एकही पद भरण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे सामान्यांना सुविधा मिळत नाहीत.
अधिकारी, कर्मचारी करतात स्वच्छता
या रुग्णालयात वर्ग ४ चे एकही पद नसल्याने धारुर येथील एकमेव कर्मचारी प्रतिनियुक्तीवर येथे घेण्यात आला; परंतु इतर एकही पद भरलेले नाही. त्यामुळे कक्ष व इतर स्वच्छता स्वत: अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच करावी लागते.
शस्त्रक्रियाही रखडल्या
शस्त्रक्रिया गृहात थोडेफार साहित्य आलेले आहे; परंतु टेबल व इतर किरकोळ साहित्य अद्याप मिळालेले नाही. या गृहातही स्वच्छतेला कोणीच नसल्याने अद्यापपर्यंत एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत असून, याचा फटका सामान्यांना बसत आहे.
आमदार, उपसंचालकांची भेट
या रुग्णालयात केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी भेट दिली. आढावा घेण्यासह पदभरती करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली. रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी सांगितले. उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनीही भेट दिली.
काय म्हणतात अधिकारी....
याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांना संपर्क केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले की, कुशल, अकुशलची ८४ पदे भरलेली नाहीत. केवळ मनुष्यबळ नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. पदभरतीबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केलेला आहे. सध्या केवळ ओपीडी सुरू असून, आयपीडी बंद आहे.
===Photopath===
250221\252_bed_14_25022021_14.jpeg
===Caption===
वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राला आ.नमिता मुंदडा यांनी भेट देत आढावा घेतला. यावेळी अक्षय मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते.