वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 04:36 PM2022-12-21T16:36:11+5:302022-12-21T16:37:16+5:30

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी

20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit | वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

Next

परळी (बीड) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयास  चालना दिली असून यासाठी २० कोटी रूपये पुरवणी मागणी अंतर्गत नुकतेच मंजूर केले आहेत. दरम्यान, निधीसाठी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे तर सातत्याने पाठपुरावा केला म्हणून निधी मिळाल्याचा दावा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

परळी शहर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीसह दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा युतीच्या मागील सत्तेत मंजूर झाला. या आराखड्यातील कामांसाठी यापूर्वी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  या निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. आता आणखी २० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. 

दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, हा आराखडा जशास तसा  मंजूर करावा आणि त्याला गती द्यावी अशी मागणी आपण यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सरकारने या मागणीची दखल घेऊन पुरवणी मागणीद्वारे या आराखडय़ासाठी २० कोटी रूपये मंजूर केले आहेत. 

सातत्याने पाठपुरावा केला
माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, यासाठी आपण मंत्री असताना सातत्याने पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आपण नगर विकास विभागाचा माध्यमातून सुमारे 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता प्राप्त करून दिली होती. यातून याआधीही एका भव्य भक्त निवासासह विविध कामे करण्यात येत आहेत.  आता आणखी 20 कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मधून मंजूर झाले आहेत.

५०० कोटींच्या निधींची मागणी करणार 
परळी वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच शहरांमध्ये भाविकांसाठी पूरक सुविधा उपलब्ध नाहीत. याचा विचार करून राज्य शासनाने ज्या पद्धतीने नुकताच पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला व त्यास 300 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला त्याच धर्तीवर परळीला देखील परळी वैद्यनाथ कॉरिडॉर मंजूर करून येथे ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडे या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.