बिबट्याच्या हल्ल्यात २० शेळयांचा मृत्यू; रामपिंपळगावसह परिसरात ५ दिवसांपासून दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:11 PM2024-01-08T19:11:26+5:302024-01-08T19:17:17+5:30
माजलगाव तालुक्यातील घटना; अनेक गावात मागील पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव: तालुक्याच्या तब्बल ६ गावखेड्यात गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ माजवला आहे. आज पहाटे रामपिंपळगावात बिबट्याने २० शेळयांवर हल्ला करून मारले.यामुळे या गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भेट दिली. तर पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन केले.
तालुक्यातील मंगरूळ नं.१, हरकीलिमगाव, मंगरूळ नं.२, राम पिंपळगाव, सावरगाव, खेर्डा या गावांसह परिसरातील गावशिवारात बिबट्या आढळून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मागील ५ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला केला असून याबाबत माहिती देऊनही वनविभागाने उपाययोजना केली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, वनविभागाच्या निष्काळजीपणाचा फटका सोमवारी रामपिंपळगाव येथील अजित रहेमोदिन सय्यद यांना बसला. त्यांच्या शेतात आज पहाटे बिबट्याने प्रवेश करत तब्बल २० शेळ्यांना हल्ला करत मृत्युमुखी पाडले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर पशू विकास अधिकारी यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे.
काय म्हणाले अधिकारी
घटनास्थळ व परिसराची पाहणी केली असता कोणत्याही पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. शवविच्छेदन केल्यानंतरच अधिक माहिती देता येईल.
- यु.एच.चित्ते , वनपरिक्षेत्र अधिकारी धारूर
जंगली प्राण्यांने हल्ला केल्याने शेळयांचा मृत्यू.
- टी.बी.लांडे , पशुधन विकास अधिकारी