रक्तदानासाठी सरसावल्या २० सामाजिक संघटना - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:34+5:302021-04-10T04:32:34+5:30
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निर्देशानुसार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सर्व रोटरी क्लब, महाविद्यालयांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ...
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निर्देशानुसार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सर्व रोटरी क्लब, महाविद्यालयांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी ठोंबरे, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉ.जयश्री बांगर, आपत्ती विभागप्रमुख उमेश शिर्के उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्या सूचनेनुसार कोविड- १९ महामारीच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार रक्तदान शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीत विभागीय रक्त संक्रमण अधिकारी व जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉ. जयश्री बांगर यांनी सर्व रक्तदान शिबिर आयोजकांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. रक्तदात्यांना आयोजकांनी दिलेल्या वेळेलाच रक्तदानास यावे जेणेकरून कोविड-१९ नियमांचे सर्व पालन होईल, असे कळविण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरामध्ये या संघटनांचा समावेश
मोरया प्रतिष्ठाण, भारतीय जैन संघटना, राजस्थान सेवा समाज, होलसेल रिटेल किराणा असोसिएशन, जिल्हा माहेश्वरी सभा, तहसील माहेश्वरी सभा बीड तालुका व्यापारी महासंघ, वैष्णवदेवी मंदिर संस्थान, रामदेव बाबा मंदिर संस्थान, विप्र समाज संघटना, बलभीम महाविद्यालयात रासेयो, केएसके महाविद्यालय रासेयो, बंकटस्वामी महाविद्यालय रासेयो, इतर नागरिक व संघटनांचा समावेश आहे.
शिबिर कुठे, कधी
९ एप्रिल रोजी बलभीमनगर पेठ, बीड, १० रोजी बालेपीर, बीड, गेवराई, काळा हनुमान ठाणा बीड, ११ एप्रिल रोजी गेवराई, सम्राट चाैक, बीड, १२ एप्रिल रोजी तकीया मस्जिद, नागोबा गल्ली बीड, १८ एप्रिल रोजी माजलगाव येथे ही शिबिरे होणार आहेत. बीडमध्ये रक्तदान सप्ताह
बीड शहरात ९ ते १६ एप्रिलदरम्यान माँ वैष्णव पॅलेस येथे रक्तदान सप्ताह होत असून, जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व्यापारी महासंघ, रोटरी क्लब बीड, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ बीड सिटी, रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलचा यात सहभाग राहणार आहे.