फरार २१ आरोपी विशेष मोहिमेत गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:12+5:302021-02-15T04:30:12+5:30
वार्षिक तापसणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील फरारी आरोपींची संख्या ...
वार्षिक तापसणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील फरारी आरोपींची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये मोक्कासह वॉन्टेड आरोपींचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. दरम्यान, पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी विशेष मोहीम आखून फरार आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. यामध्ये विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपींची संख्या १०५४ इतकी आहे. तर, फरार व स्टँडींग वॉरंटमधील ११९ यासह इतर गुन्ह्यांतील ८२ असे फरार आरोपींची संख्या आहे. शनिवारपासून वाँटेड, फरार आरोपींविरोधात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने १७ आरोपी पकडले तर अंमळनेर पोलिसांनी १ व धारूर पोलिसांनी ३ अशा एकूण २१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यापुढेदेखील आरोपी ताब्यात घेण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी सहाय्य करणाऱ्यांना बक्षीसदेखील देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींसंदर्भात पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात आरोपी येणार ताब्यात
अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी मिळून न आल्यामुळे गुन्हे प्रलंबित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, पुढील काळात या मोहिमेअंतर्गत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी या मोहिमेची मदत होणार आहे.