रेमडेसिवीर इंजेक्शन परत देण्यास २१ खासगी रुग्णालयांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:32+5:302021-07-14T04:38:32+5:30

बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्याने जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना उसणवारीवर इंजेक्शन दिले होते. आतापर्यंत केवळ ...

21 private hospitals refuse to return remedesivir injection | रेमडेसिवीर इंजेक्शन परत देण्यास २१ खासगी रुग्णालयांची टाळाटाळ

रेमडेसिवीर इंजेक्शन परत देण्यास २१ खासगी रुग्णालयांची टाळाटाळ

Next

बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्याने जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना उसणवारीवर इंजेक्शन दिले होते. आतापर्यंत केवळ तिघांनी हे इंजेक्शन परत केले असून, अद्यापही २१ खासगी रुग्णालयांकडून ६४६ इंजेक्शन येणे बाकी आहेत. इंजेक्शन परत देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यांना पुन्हा स्मरण पत्र दिले असून, आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना ठणठणीत करण्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा वाटा असल्याचा दावा दुसऱ्या लाटेत करण्यात आला. मार्च, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. खाटांसह औषधांचा तुटवडा जाणवत होता. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही सहभाग होता. खासगी रुग्णालयांमध्ये जादा पैसे मोजूनही इंजेक्शन मिळत नव्हते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची धावपळ होत होती. हाच धागा पकडून प्रशासनाने खासगी रुग्णालयांना उसणवारीवर इंजेक्शन देण्याची परवागनी दिली होती. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातून ८०६ इंजेक्शन उसणे देण्यात आली होती. आता रुग्णसंख्या कमी झाली असून, इंजेक्शनचा साठाही मुबलक आहे. त्यामुळे सर्वांनी इंजेक्शन परत करणे आवश्यक होते. जिल्हा रुग्णालयाने वारंवार पत्र देऊनही २१ खासगी रुग्णालयांनी अद्यापही एकही इंजेक्शन परत केलेले नाही. केवळ शिवकमल हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल आणि महावीर हॉस्पिटल या तीनच रुग्णालयांनी इंजेक्शन परत केले आहेत. ज्यांच्याकडे इंजेक्शन बाकी आहेत त्यांना सोमवारी आणखी एकदा पत्र काढले आहे. आता हे पत्र शेवटचे असून, आता थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी दिला आहे.

इंजेक्शन न देणारी हीच ती खासगी रुग्णालये

बीडमधील धूत हॉस्पिटल १२०, सानप बाल रुग्णालय १०६, माउली हॉस्पिटल २१, दीप हॉस्पिटल ३३, पंचशील हॉस्पिटल २, शुभदा हॉस्पिटल ८, नोबल हॉस्पिटल २३, कृष्णा हॉस्पिटल ६९, संजीवनी हॉस्पिटल ६१,नवजीवन हाॅस्पिटल २६, सूर्या हॉस्पिटल ९७, माजलगावचे यशवंत हॉस्पिटल २७, देशपांडे हॉस्पिटल ४२, गेवराईचे आधार हॉस्पिटल १६, परळीतील गजानन हॉस्पिटल २, आष्टीतील ध्रुव हॉस्पिटल २, मोहरकर हॉस्पिटल ३, शिरूरचे ज्ञानसुधा हाॅस्पिटल १३, पुणे येथील केअर हॉस्पिटल चिंगळी १, समर्थकृपा हॉस्पिटल वाकड ३ या रुग्णालयांनी अद्यापही इंजेक्शन परत केलेले नाहीत. ----

उसणवारीवर दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन परत देण्याबाबत वारंवार पत्र देण्यात आलेले आहे. सोमवारी पुन्हा एक पत्र दिले आहे. आता यापुढे पत्र न काढता थेट कारवाई केली जाईल. सर्वांनी उसणे घेतलेले इंजेक्शन परत करून सहकार्य करावे.

डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: 21 private hospitals refuse to return remedesivir injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.