बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यासाठी २१ टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:18 AM2019-05-31T00:18:52+5:302019-05-31T00:20:00+5:30
दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले.
बीड : दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सुमारे १० लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील १०० गावांची दररोज तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले.
दुष्काळामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार आले असताना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टतर्फे ३० टँकर देण्याची घोषणा केली होती, त्या पैकी २१ टँकर ३० मे रोजी दाखल झाले. टँकरची प्रत्येकी ४० हजार लिटर इतकी क्षमता असून, आणखी ९ टँकर लवकरच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील लॉ कॉलेज परिसरात या टँकरचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उषा दराडे, सुनील धांडे, सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.