संचारबंदीच्या काळात २१ हजार पॉझिटिव्ह; १५ दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:13+5:302021-05-05T04:55:13+5:30
बीड : जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित ...
बीड : जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत जिल्ह्यात तब्बल २१ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी १८ हजार ५४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची बातमीही दिलासादायक आहे. चिंताजनक म्हणजे संचारबंदी असतानाही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत ४ लाख ३ हजार ५१७ कोरोना संशयितांच्या चाचणी करण्यात आली होती. यातील ५८ हजार १२४ लोक पॉझिटिव्ह आढळले तर ५० हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ९५९ रुग्णांचा बळी गेला आहे. पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जास्त नव्हता. ४०४ ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. आता यावेळी रोजच एक ते दीड हजारापेक्षा जास्त रुग्ण रोजच आढळत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात संचारबंदी असतानाही रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. चाचण्या वाढल्या तरी बाधितांचा टक्काही वाढला आहे.
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तेव्हापासून लोक गाफील राहत आहेत. सुरुवातीच्या काळात काळजी घेणारे लोक दुसऱ्या लाटेत बिनधास्त फिरताना दिसत आहेत.
पहिल्या लाटेत लोकांना भीती होती. लॉकडाऊनही १०० टक्के पाळण्यात आले. सध्याही लॉकडाऊन असले तरी त्याचे तंतोतंत पालन होत नाही. लोक बाहेर फिरतात.
विनाकारण लोक बाहेर फिरण्यासह मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, वारंवार हात न धुणे, कोरोना वॉर्डमध्ये वावरणे यामुळे संसर्ग वाढत चालला आहे. हीच कारणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढवीत आहेत.
ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील जवळपास ४०० पेक्षा जास्त गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून ठेवले होते; परंतु आता हीच संख्या १०० वर आली आहे.
आगाेदर शहरातच रुग्णसंख्या वाढत होती. आता ग्रामीण भागात वाढत आहे. आता तेदेखील काळजी घेत नसल्याचे दिसत आहे.
१ रुग्ण आढळला तरी लोक घराबाहेर पडत नव्हते. आता ४० आढळले तरी त्याच्या घराच्या बाजूला जाऊन बसतात.