कानिफनाथ दुध संकलन केंद्रातील २४८ लिटर दुध नष्ट; आष्टीत सलग दुसरी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:49 PM2023-09-13T19:49:41+5:302023-09-13T19:49:56+5:30
ही कारवाई जिल्हा दुध भेसळ समिती,अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आली.
- नितीन कांबळे
कडा - दूध भेसळ रोखण्यासाठी शासनाने धाडसत्र सुरू केले असून आष्टी तालुक्यात तीन दिवसात दुसऱ्यांदा संकलन केंद्रावर जाऊन तपासणी करण्यात आल्या आहेत. कडा येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रावर तपासणी केली असता २४८ लिटर दुध नष्ट करण्यात आले. ही कारवाई जिल्हा दुध भेसळ समिती,अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने बुधवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील कडा येथे बुधवारी सकाळी जिल्हा दुध भेसळ समिती, व अन्न व औषध प्रशासन बीड याच्या संयुक्त पथकाने कानिफनाथ दुध संकलन केंद्र कडा येथे तपासणी केली. यावेळी संशयास्पद २४८ लिटर दूध आढळून आल्याने ते नष्ट करण्यात आले. तपासणी दरम्यान काढलेले ३ नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई त्रिभुवन कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड, अजित मैत्रे, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन (औरंगाबाद विभाग) व सय्यद इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस.बी. गायकवाड , सहायक अधिकारी मुख्तार शेख, एस.ए.वैधमापक, सोनवणे झेड.के. विस्तार अधिकारी व पोलिस भावले यांनी केली.