श्री.क्षेत्र नारायण गडाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:46+5:302021-02-23T04:51:46+5:30
बीड: श्री.क्षेत्र नगद नारायण गडावर राज्यातील भाविकांची श्रध्दा आहे. गडाच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात २५ कोटींची घोषणा केली होती ...
बीड: श्री.क्षेत्र नगद नारायण गडावर राज्यातील भाविकांची श्रध्दा आहे. गडाच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात २५ कोटींची घोषणा केली होती परंतु ती पाळण्यात आली नाही. आता गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये लवकर उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी चर्चा करताना दिली.
बीड येथे २२ फेब्रुवारी रोजी मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्याशी गडाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष बबन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बीड पंचायत सभापती बळीराम गवते यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडाच्या विकासासाठी २५ कोटी देऊ, असा शब्द नगद नारायणाच्या साक्षीने तत्कालीन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिला होता. यातील २ कोटींच्या कामाला मान्यता मिळाली. मात्र, उर्वरीत निधी देण्यात आलेला नाही. विकास कामाचा आराखडा पुन्हा सादर करावा लागणार असून त्याला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर विकासाकामांना सुरुवात होईल. गडाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुंडे यांनी दिली.
नारायणगडावर होणार ही कामे
नारायणगडावर यात्रास्थळ, मंदिरातील विधुतिकरण, सौर यंत्रणा, विद्युत निर्मिती, मंदिर परिसरातील दगडी फरशी बांधकाम करणे, प्रसादालय, सार्वजनिक शौचालय, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि बाग, रस्ते रुंदीकरण, गोशाळा, दवाखाना, संस्थानच्या परिसरात वाटर शेड मॅनेजमेंट, पाण्याची टाकी, रस्ते विकास, तट बंदी व गेट, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, गेस्ट हाऊस, मल्ल निवास, वेस, मल्ल आखाडे, जिम मंडप, तालीम, सार्वजनिक शौचालय, अध्यात्मिक केंद्र, आयुर्वेदिक केंद्र, पेरिफेरी लँडस्केप, ग्रीन हाऊस, भक्त निवास, शाळा, मुला मुलींसाठी वसतिगृह, वाचनालय, क्रीडा संकुल, सांस्कृतिक सभा केंद्र, उद्यान, वृद्धश्रम, पोलीस चौकी, बस स्टँड, रिक्षा स्टँड, वाहनतळ, उपहार गृह, दुकाने आदी कामे करण्यात येणार आहेत.