दुष्काळमुक्तीसाठी ५ मिनिटांत जमा झाला २५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:45 AM2018-04-21T00:45:55+5:302018-04-21T00:45:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी ६० हजार रुपये जमविल्यास जैन संघटनेच्या स्थानिक पदाधिका-तर्फे २० हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते, तालुका प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सभा झाली.
श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी,पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांतील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग वाढविणे, श्रमदान करणाºया गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी करणे, लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था करणे या मुख्य मुद्द्यांवर सभेत चर्चा झाली.
या वेळी आ. प्रा. संगीता ठोबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, प्राचार्य डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुंदडा, पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख, विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक मिलिंद बाबजे, बीडीओ दत्ता गिरी, किशोर बंब, पानी फाउंडेशनचे संतोष सिंनगारे, प्रसाद चिक्षे, ज्ञानप्रबोधिनीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.
श्रमदान करणाºया गावांना शासनातर्फे दिला जाणारा निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी प्रशासनास केली. भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संघटनांमुळेच गावे टंचाईमुक्त झाली आहेत, अशा शब्दात दुष्काळाविरुद्ध लढणाºया सामाजिक संस्थांचा आ. प्रा. ठोंबरे यांनी गौरव केला. आतापर्यंतचे काम उत्कृष्ट असून पहिला पुरस्कार अंबाजोगाईला मिळावा, यासाठी संघटीतपणे प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, श्रमदान करणाºया गावांमध्ये जेसीबीला लागणाºया डिझेलसाठी शासनातर्फे आर्थिक तरतूद केली आहे. तो ग्रामपंचायतींना वर्ग केला जाणार आहे.
राजकिशोर मोदी , अक्षय मुंदडा , संतोष सिंनगारे, किशोर पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. रतीलाल कुंकुलोळ, निलेश मुथ्था, जैन श्रावक संघ अंबेजोगाइचे अध्यक्ष प्रेमचंद बडेरा, गौतमचंद सोळंकी, प्रकाश मुथ्था, प्रेमचंदजी मुथ्था, शांतीलाल सेठिया, प्रकाश सोळंकी, विजय मुथ्था, सुनील मुथ्था, ललित मुथ्था, अमित रांदड, इंदर लोढा, संतोष कुंकलोळ, नागेश औताडे, सतीश मोरे, नानासाहेब गाठाळ, मिलिंद बाबजे, मनोज लखेरा, संजय सुराणा, गणेश उमनवार आदी उपस्थित होते.
पाण्यासाठी युद्धाची वाट नको, दुष्काळाशी युध्द करा
भूकंप, दुष्काळ, मुलींची घटती संख्या यामुळे बीड जिल्ह्याचे चित्र खूप भयानक निर्माण झाले आहे. नकारात्मक परिस्थितीतून जिल्ह्याला बाहेर काढणे एक आव्हान आहे. सलग १० वर्षे काम केल्यास समस्यांवर मात करण्यात यश मिळते.
आमीर खान यांनी पाणीप्रश्न हाती घेतला तेंव्हा दुष्काळाची समस्या सुटेल अशी प्रत्येकाची भावना झाली आहे. भविष्यात महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगले दिवस येतील. पाण्यासाठी युद्ध होईल यासाठी वाट बघत बसण्यापेक्षा दुष्काळाविरुद्ध युद्ध पुकारले तर सर्व समस्या सुटतील असे शांतीलाल मुथ्था यावेळी म्हणाले.