मादळमोहीमध्ये पाण्यातून २६ शेळ्यांना विषबाधा; १२ मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:39 PM2018-11-07T23:39:45+5:302018-11-07T23:42:17+5:30
पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
मादळमोही भागवत सीताराम गावडे यांच्याकडे २६ शेळ्या आहेत. मंगळवारी त्यांनी या शेळ्या चारण्यासाठी शेतात नेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ४ वा. शेतातून शेळ्या परत आणून गावडे यांच्या गावालगत असलेल्या वाड्यात बांधल्या. मात्र यानंतर अचानक शेळ्यांना चकरा येण्यास सुरूवात झाली. यावेळी गावडे यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ.मोहोळकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शेळ्यांवर उपचार सुरू केले. मात्र काही ठराविक वेळाने यामधील १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही शेळ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान यामध्ये भागवत गावडे यांचे जवळपास १ लाख २० हजारांचे नुकसान झाले असून, तलाठ्यांनी पंचनामा करुन वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवला आहे. दिवाळीच्या पूर्वसंधेला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने सदरील शेतकºयास मदत करण्याची मागणी होत आहे.
पाण्यातून विषबाधा ?
गावडे यांनी दिवसभर शेळ्या शेतशिवारात चारल्या. या शेळ्यांनी शेतात एका ठिकाणी साठवलेले पाणी पिलेले असल्याने यामधूनच ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचे पीएम करण्यात आले असून, तो आल्यानंतरच शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे कारण स्पष्ट होईल.
मदतीला धावली रासपा
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ मादळमोही येथे जाऊन शेतकºयाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी गावडे यांना धीर देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ३० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून मेशपाल योजनेतून १ लाख निधी मंजूर करु न देण्याचे देखील आश्वासन यावेळी परमेश्वर वाघमोडे यांनी दिले.