२६ विद्यार्थी रेस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:44 AM2019-03-14T00:44:45+5:302019-03-14T00:46:20+5:30
राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांनी २६ विद्यार्थ्यांवर रेस्टिकेटची कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांनी २६ विद्यार्थ्यांवर रेस्टिकेटची कारवाई केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनीही बीड शहरातील परीक्षा केंद्रांवर पाहणी करत कारवाई केली तर परीक्षा केंद्रात मोबाईल बाळगणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले.
बुधवारी इयत्ता दहावीच्या भूमितीचा पेपर होता. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अर्जुनेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ४ विद्यार्थ्यांवर शिक्षणाधिकारी (मा. ) भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली. तर शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांच्या पथकाने सिरसदेवी येथील केंद्रावर २ आणि जातेगाव येथील केंद्रावर एक अशा तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रेणुकामाता विद्यालय परक्षा केंद्रावर डायटचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली. उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने बीड तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळा केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.
बीडमध्ये १७
जणांवर कारवाई
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या पथकाने दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील संस्कार विद्यालय परीक्षा केंद्राची पाहणी केली. या दरम्यान कॉपी करताना आढळलेल्या ११ विद्यार्थ्यांवर तसेच बालेपीर भागातील प्रगती विद्यालय परीक्षा केंद्रावर ६ अशा एकूण १७ विद्यार्थ्यांवर रेस्टिकेटची कारवाई करुन केंद्र संचालकांची कानउघाडणी केली.