साईंच्या पालखीची २७ वर्षांची परंपरा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:44+5:302021-01-23T04:34:44+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथून निघणाऱ्या श्री साई पालखी सोहळ्याची २६ वर्षाची परंपरा असलेली मराठवाड्यातील मानाची ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथून निघणाऱ्या श्री साई पालखी सोहळ्याची २६ वर्षाची परंपरा असलेली मराठवाड्यातील मानाची पहिली पालखी म्हणून ओळख आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षी २२ जानेवारी शुक्रवारी सकाळी मोजक्या साई भक्तांसह खाजगी वाहनाद्वारे साई पादुका शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या. पायी पालखी वारी सोहळ्याची परपंरा कोरोना महामारीमुळे यंदा खंडीत झाल्याची खंत साईभक्तांना आहे. तालुक्यातील अंबासाखर कारखाना येथून गोकुळ महाराज वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली २६ वर्षांपासून साई पायी पालखी सोहळा मजल दरमजल करत अखंडीतपणे शेकडो साईभक्तांसह शिर्डीला जात असतो. पालखी सोहळ्यात जिल्ह्यासह परजिल्हयातून शेकडो साईभक्त दाखल होत असतात. या वर्षी कोरोना महामारीमुळे राज्यातील मंदिरे उशिराने सुरु करुन दर्शनाला परवानगी दिली आहे. परंतू अद्याप रथ,पालखी काढण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातून शिर्डी, पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या बंद आहेत. त्यामुळे अंबासाखर कारखाना येथुन २२ जानेवारी रोजी मोजक्या भक्तांसह साई पादुकांची खाजगी बस मार्गस्थ झाली. धारुर,वडवणी,बीड, गेवराई,उमापूर, शेवगाव,नेवासा, श्रीरामपूर, साई मंदिर वाकडी, राहतामार्गे शिर्डी येथे पादुका पोहचतील.