बीड येथील कार्यमुक्त २७९ शिक्षकांना दिलासा, पण लेखी पत्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:04 AM2018-11-21T00:04:37+5:302018-11-21T00:05:41+5:30
येथील जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २७९ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी या शिक्षकांनी उपोषण सुरु केले. तर शिक्षकांची बाजू मांडण्यासाठी मुंबईत गेलेल्या जि. प. च्या काही सदस्यांनी पाठपुरावा करत या कार्यमुक्तीच्या आदेशावर मंत्रालय समितीने निर्णय घ्यावा अशी याचना केली. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती देत पुढील कार्यवाही चालू शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मेमध्ये करण्याबाबत आश्वासन मिळाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत यासंदर्भात शासनाचे कोणतेही लेखी आदेश, सूचना वा पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २७९ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी या शिक्षकांनी उपोषण सुरु केले. तर शिक्षकांची बाजू मांडण्यासाठी मुंबईत गेलेल्या जि. प. च्या काही सदस्यांनी पाठपुरावा करत या कार्यमुक्तीच्या आदेशावर मंत्रालय समितीने निर्णय घ्यावा अशी याचना केली. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती देत पुढील कार्यवाही चालू शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मेमध्ये करण्याबाबत आश्वासन मिळाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत यासंदर्भात शासनाचे कोणतेही लेखी आदेश, सूचना वा पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाले नव्हते.
बीड जिल्हा परिषदेत २०१४ मध्ये आंतर जिल्हा बदलीने ८८६ प्राथमिक शिक्षक आले होते. या शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत शासनाकडे तक्रारी तसेच न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.
न्यायालयाचे निर्देश व शासनाच्या सूचनेनुसार २३ आॅगस्ट रोजी औरंगाबाद मागासवर्गीय कक्षाकडून शिक्षण विभागाने बिंदू नामावली तपासून घेतली. त्यानुसार नियमाप्रमाणे शिक्षकांना सामावून घेण्यात आले. तर बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ४८३ सहशिक्षकांपैकी सेवाकनिष्ठ ३०२ शिक्षकांची यादी प्रसिद्ध करुन हरकती मागविण्यात आल्या. त्या दुरुस्त करुन १८१ वस्तीशाळा शिक्षक व आंतरजिल्हा बदली इतर प्रवर्गात असल्याचे कागदपत्र सादर केलेले २२ शिक्षक वगळून २७९ शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा ४ सप्टेंबर रोजीचा निर्णय व शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त केले होते.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी कार्यमुक्त शिक्षकांनी उपोषण सुरु केले होते. रात्री उशिरा या शिक्षकांच्या कृती समितीच्या प्रमुखांशी संपर्क साधून आश्वासन देण्यात आले. मेपर्यंत कार्यमुक्तीची कार्यवाही करु नये असे आश्वासन मिळाल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत असे कोणतेही आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला मिळालेले नव्हते. दिवसभर या आदेशाची प्रतीक्षा शिक्षकांना होती.
शासनाच्या सूचनेनुसार होईल कार्यवाही
बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत केलेल्या कार्यमुक्तीच्या कार्यवाहीबाबत माहिती शासनाला कळविली आहे. शासनाच्या सूचना व आदेश जसे असतील तशी कार्यवाही करण्यात येईल. अद्याप लेखी आलेले नाही. बिंदू नामावली मावग निश्चित करते. ती तयार करुन देण्याचे काम आमचे असते. आठ वेळा रोस्टर दुरुस्ती करुन आवश्यक पूर्तता केलेली आहे. त्यामुळे बिंदू नामावली चुकीची म्हणता येणार नाही. - अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बीड.
२२ शिक्षकांच्या सुनावणीत कागदपत्रांची पडताळणी
अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २२ शिक्षकांनी त्यांची नियुक्ती व आंतर जिल्हा बदली इतर प्रवर्गात असल्याचे कागदपत्र सुनावणीदरम्यान सादर केले होते. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी २२ शिक्षकांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरु होती. या २२ शिक्षकांचा अहवाल त्या- त्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून माहिती मागविण्यात येत आहे.