वाघाळा येथील २८ शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:36+5:302021-01-03T04:33:36+5:30
लातूर ते लोखंडी सावरगाव हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे. सिमेंटचा ...
लातूर ते लोखंडी सावरगाव हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे. सिमेंटचा हा रस्ता बनवताना अंबाजोगाई तालुक्यातील व परळी मतदारसंघातील बर्दापूर, सेलूअंबा व वाघाळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना त्वरित याचा मावेजा दिला जाईल, असे सांगून या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. वाघाळा येथील रस्ता व उड्डाणपूल करण्यासाठी येथील ६७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यापैकी ३९ शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. हा मोबदला देताना शेतकऱ्यांची तोंडे पाहून हा मोबदला देण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. जमीन संपादित करून तीन वर्षे झाले तरी लाभार्थ्यांना राष्ट्रीय महामार्गाकडून भूसंपादनाची रक्कम मिळाली नाही. हा पूल बांधताना अनेकांची घरे उद्ध्वस्त करून याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते; परंतु मागील एक वर्षापासून उड्डाणपुलाचे काम रखडल्याने येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मला वेळ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता रोहिदास गायकवाड यांनी सांगितले.
माझे वाघाळा रस्त्यालगत घर आहे. घरासमोरील अर्धा गुंठा जागा महामार्गाच्या वतीने भूसंपादित करण्यात आली आहे. कार्यालयाचे उंबरठे झिजवून व अधिकाऱ्यांच्या विनवण्या करूनही अद्याप याचा मोबदला मला मिळाला नाही.
- अमोल पतंगे
(रहिवासी, वाघाळा)