बीडमध्ये काळ्या बाजारात जाणारे २८०० लिटर रॉकेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:06 PM2018-07-20T18:06:56+5:302018-07-20T18:07:47+5:30
अंमळनेर येथील राशन दुकानातून कमी किंमतीत रॉकेल खरेदी करुन बीडच्या काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला.
बीड : अंमळनेर येथील राशन दुकानातून कमी किंमतीत रॉकेल खरेदी करुन बीडच्या काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये २८०० लिटर रॉकेल व पिकअप जप्त करण्यात आले. याप्रकरणी रॉकेल माफियासह तिघांविरोधात पेठ बीड ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे.
बीडमध्ये मागील अनेक महिन्यांपासून शेख जावेद उर्फ बब्बू हा राशनचे रॉकेल खरेदी करुन काळ्या बाजारात विक्री करीत असे. त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. गुरुवारी सायंकाळी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथून एका पिकअपमधून रॉकेल येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या पथकासमवेत सापळा लावला. सपोनि दिलीप तेजनकर यांनी बीड शहरातील इमामपूर रस्त्यावर पिकअपचा पाठलाग करुन जावेदच्या घरी छापा टाकला. त्यामध्ये २८०० लिटर रॉकेल जप्त करण्यात आले. जावेदसह कट्टू नजीर व अब्दुल अलिमोद्दीन यांच्याविरोधातही पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार बालाजी दराडे यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुरवठा विभागाला सोबत घेत पो. नि. पाळवदे, पेठ बीड ठाण्याचे पो. नि. बी. एस. बडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. इतर साहित्याचीही तपासणी करुन बब्बूची गुन्हेगारी क्षेत्रातील पार्श्वभूमी काढली.
कारवाई रोखण्यासाठी फोनाफोनी
बब्बू हा अट्टल गुन्हेगार आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. त्याला राजकीय पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी रात्री मात्र राजकीय व्यक्तींनी कारवाई करु नये यासाठी फोनाफोनी न करता चक्क पोलीस विभागातीलच काही अधिकाºयांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. परंतु अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशामुळे शुक्रवारी दुपारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान ‘ते’ अधिकारी कोण ? याबाबत पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.