मंदिर परिसर विकासाठी १३३ कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:17 AM2020-01-13T00:17:40+5:302020-01-13T00:18:57+5:30
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना दिली.
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना दिली.
धनंजय मुंडे यांनी रविवारी सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन कामास सुरूवात केली. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री धनंजय मुंडे यांचा श्री वैद्यनाथाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून व फेटा बांधून मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परळीकरांचा नागरी सत्कारावेळी उत्साह पाहून आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे, परळीकराच्या अपेक्षा मोठ्या आहेत, त्या पुर्ण करण्यात येतील व विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्दही वैद्यनाथाच्या मंदिरात धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
प्रारंभी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथास अभिषेक करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विपीन पाटील, सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा.प्रदीप देशमुख, नंदकिशोर जाजू, शरद मोहरीर, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख यांच्यासह बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, चंदूलाल बियाणी, सुरेश टाक, शिवकुमार व्यवहारे, नंदकिशोर तोतला, ओमप्रकाश तापडिया, गोविंद देशमुख, राजेश्वर चव्हाण, अभय मुंडे, राजेंद्र सोनी, डॉ.मधुसूदन काळे, विजय लड्डा, सारडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले.
केंद्राकडे प्रयत्न करणार : मुंडे यांची ग्वाही
प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग केंद्र सरकारच्या यादीत दर्जा सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. यासाठी आपण वैद्यनाथ मंदिराच्या विश्वस्तासोबत राहणार आहोत. त्यांच्या अडचणी शासन पातळीवर सोडविण्यात येईल असे मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून येणारे भाविक परळी शहरात थांबले पाहिजेत यासाठी परळी परिसरातील मंदिराचाही विकास करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन योजना आखण्यात येईल, पर्यटनाच्या कामालाही गती देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
वैद्यनाथ मंदिर परिसर विकास कृती आराखड्यासह पर्यटनाच्या विकासाची कामेही त्वरित होण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही मुंडे म्हणाले.