३७ कोटींच्या इमारती यंत्र, साहित्याअभावी धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:58 PM2019-08-21T23:58:21+5:302019-08-21T23:58:29+5:30
अंबाजोगाई येथे स्त्री रुग्णालय १७ कोटी रुपये खर्चून, तर वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र हे २० कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. मात्र, केवळ यंत्र सामग्री आणि साहित्य नसल्याने या दोन्ही इमारती धूळखात आहेत.
बीड : अंबाजोगाई येथे स्त्री रुग्णालय १७ कोटी रुपये खर्चून, तर वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र हे २० कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. इमारतीचे कामही दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ यंत्र सामग्री आणि साहित्य नसल्याने या दोन्ही इमारती धूळखात आहेत. यंत्र व साहित्य उपलब्ध करुन देण्यास आरोग्य विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
अंबाजोगाई येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व १०० खाटांचे वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र मंजूर झालेले आहे. दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि इतर कामेही पूर्ण झालेली आहेत.
जवळपास दीड वर्षांपूर्वीच सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. कामे सुरु असतानाच बीड आरोग्य विभागाने आवश्यक असणारी यंत्र सामग्री आणि साहित्याची मागणी केली. याचा पाठपुरावाही केला. मात्र, दीड वर्ष उलटूनही अद्याप यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. एकीकडे श्रेयवादासाठी लढणारे लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या प्रश्नावर शांत आहेत. त्यामुळे वरिष्ठ कार्यालय यावर गांभीर्याने विचार करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.
पाठपुरावा सुरुच - उपसंचालक
दोन्ही रुग्णालयाचे पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. कुशल, अकुशल पदभरतीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल. यंत्र व साहित्य खरेदीसाठी आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरुच आहे. इतर रुग्णालयाला उपलब्ध झालेले थोडे जरी साहित्य मिळाले तरी आम्ही आमची सेवा सुरु करणार आहोत. लवकरच ते उपलब्ध करु.
- डॉ.एकनाथ माले
उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर