ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठी उरले ३ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:31 AM2021-09-13T04:31:57+5:302021-09-13T04:31:57+5:30

अंबाजोगाई : महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी ...

3 days left for registration on e-crop survey app | ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठी उरले ३ दिवस

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठी उरले ३ दिवस

Next

अंबाजोगाई : महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा १५ ऑगस्टला श्रीगणेशा झाला. आता या ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास ३ दिवस उरले असूनही शेतकऱ्यांचा अजूनही थंड प्रतिसाद दिसून येत आहे.

ई-पीक पाहणी ॲपचे लॉंचिंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-पीक पाहणी ॲप देशाला मार्गदर्शक ठरेल, असे म्हटले होते. दररोज हवामानात बदल होत असून कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात. कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदत होईल. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही बोलले जात आहे. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प असल्याने ई-पीक योजना तालुक्याला अपवादच ठरते की काय, अशीच स्थिती सध्या तरी आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन व जनजागृती सुरू आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे माहिती नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या तीन दिवसांच्या आत या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे, असा दंडकही शासनाने शेतकऱ्यांना लागू केला आहे.

शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद

तालुक्यातील शेतकऱ्यांचा ॲपद्वारे माहिती भरण्यास अद्यापही अल्प प्रमाणात प्रतिसाद आहे. जरी ॲप डाऊनलोड करायचे म्हटले तरी ते ॲप सहज ओपन होत नाही. तर ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी रेंज उपलब्ध नाही. तर अनेकांकडे स्मार्ट फोन नाहीत. अशा विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांचाही या योजनेस पाहिजे तसा प्रतिसाद नाही. अशाही स्थितीत अधिकारी, तलाठी पीक पाहणी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत.

Web Title: 3 days left for registration on e-crop survey app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.