न्याय मिळवून देतो सांगून पिडीतेच्या कुटुंबाला ३ लाखांचा गंडा, कारवाईसाठी कुटुंबाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 05:02 PM2022-09-27T17:02:35+5:302022-09-27T17:04:20+5:30
न्यायाच्या अपेक्षेत असलेल्या पिडीत कुटुंबाला मात्र सर्व आरोपींना जामीन मिळाल्याने धक्का बसला.
दिंद्रुड (बीड) - एका सोळा वर्षीय मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याची घटना जून महिन्यात घडली होती. या प्रकरणात न्याय मिळवून देतो असे म्हणत एका भामट्याने पिडीतेच्या पित्यास तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिसात, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही भामट्यावर कारवाई होत नसल्याने पिडीतेच्या कुटुंबाने दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आजपासून उपोषण सुरु केले आहे.
धारूर तालुक्यातील एका सोळा वर्षीय मुलीवर पळून नेत अत्याचार केल्याप्रकरणी सचिन तोंडे,राजेभाऊ बडे व दैवशाला बडे यांच्यावर दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात स्वतःला पोलीस मित्र सांगणाऱ्या अकिल मोहम्मद सय्यद या भामट्याने मुलीच्या वडिलांकडून तुम्हाला न्याय मिळवून देतो असे सांगत वेळोवेळी पैसे उकळले. या भामट्याने जवळपास तीन लाख रुपयाला पीडित कुटुंबाला चुना लावला आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देतो, माझे पोलिसांसोबत चांगले संबंध असल्याचे सांगत यासाठी पैसे द्यावे लागतात असे सांगून वेळोवेळी १ लाख छत्तीस हजार पाचशे रुपये घेतले. तसेच माजलगाव, अंबाजोगाई, बीड अशा ठिकाणी विनाकारण फिरवत दीड लाख रुपये अवास्तव खर्च केल्याचे पीडित पित्याने निवेदनात म्हटले आहे.
न्यायाच्या अपेक्षेत असलेल्या पिडीत कुटुंबाला मात्र सर्व आरोपींना जामीन मिळाल्याने धक्का बसला. पिडीत पित्याने भामट्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. तरीही त्याच्यावर दिंद्रुड पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे आजपासून पिडीत कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत. संबंधित सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करेपर्यंत उपोषण न सोडण्याच्या पावित्र्यात हे कुटुंब आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रीद पोलिसांचे असून अन्यायाला वाचा फोडत न्याय मिळवून देण्याचे कृर्तव्य असताना गेल्या एक महिन्यापासून पीडित कुटुंबाकडूनच पैशाची मागणी करणाऱ्या भामट्यावर मेहरनजर दिंद्रुड पोलिसांची का हा प्रश्न निर्माण झाला आहे.