बीड जिल्ह्यात अडीच महिन्यांत ३० शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM2018-03-16T00:42:17+5:302018-03-16T00:43:43+5:30
नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा, लोकसभेत बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचा विषय गाजला होता. त्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त जिल्हा बीडची घोषणा करण्यात आली. तसेच आत्महत्या रोखण्यासठी स्थानिक पातळीवर विविध योजना राबवल्या गेल्या. जनजागृती अभियान राबवले गेले. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. शासन, नाम फाऊंडेशन व इतर संस्थांकडून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देखील केली गेली.
शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी मात्र अजून केली गेली नाही. त्यामध्येच नगदी पीक असलेल्या कापसावर बोंडअळीने हल्ला केला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. तसेच कापसाला भावही चांगला न मिळाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला. कापसाला योग्य भाव नसल्यामुळे आज देखील जिल्ह्यात ६० टक्क्यांवर कापूस शेतकºयांडेच आहे. अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रांवर तूर उत्पादक शेतकºयांची अडवणूक करण्यात आली. तसेच शेतात काम करणाºयांची मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीची मागणी
शासनाने कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, बोंडअळीमुळे झालेली नुकसानभरपाई सरसकट द्यावी, तूर, कापसाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकरी नितीन खंडागळे, अशोक खंडागळे यांनी केली आहे.