परळीत पित्राच्या जेवणातून ३० जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:05 PM2017-09-18T13:05:22+5:302017-09-18T14:47:42+5:30
शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे.
परळी ( बीड ) : शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे. यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कृष्णानगर भागातील नागरिकांना रविवारी रात्री उशिरा मळमळ होणे, उलट्या, गरगरणे अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला काही लोकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू ही संख्या वाढली. काल या गल्लीत पित्राचे जेवण होते. जे लोक या जेवणाला आले होते त्यातील बहुतांश लोकांना हा त्रास जाणवू लागला. यात ३० जणांना विषबाधा झाली आहे. जेवणामधून विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या भागातील नागरिकांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी धाव घेऊन या रुग्णांना उपचार व मदतकार्य करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांवर तातडीने सर्व उपचार सुरू करण्यात आले असून रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितले.