अंबाजोगाईत २७ लाख रुपयाचा ३० पोते गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 07:02 PM2019-09-26T19:02:23+5:302019-09-26T19:04:15+5:30
पोलीसांना पाहून टेम्पो चालक अंबाजोगाई शहरात न येता पळून जाण्यासाठी लोखंडी सावरगावकडे वळला.
अंबाजोगाई : २६ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा अवैध व बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी जात असताना अंबाजोगाई पोलिसांनी कारवाई करून जप्त केल्याची घटना गुरुवारी दुपारी अंबाजोगाई शहराजवळील आडस फाट्याजवळ घडली. महीनाभरापासून परळी तालुक्यात आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये सातत्याने गुटख्याची धरपकड सुरू असल्याकारणाने अवैध व बेकायदेशीररित्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अंबाजोगाई येथे नव्याने रुजु झालेल्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे ,पोलीस कर्मचारी आवले एम.व्ही., प्रकाश सोळंके ,नागरगोजे यांनी ही कारवाई केली आहे.नव्याने रूजू झालेल्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आणि पोलीस उपनिरिक्षक धस यांनी अवैध व बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गुटखा विक्रीविरूद्ध विशेष लक्ष्य केंद्रीत केले आहे.
गुरूवारी दुपारी लातुरहून अंबाजोगाई शहरात अवैध व बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गुटख्याचे तीस पोते ( १८० बॅग )घेउन टेम्पो क्र एम.एच.१३ सी.यु.४५६८ येत होता .याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळाली. तात्काळ शहर पोलीसांनी लातुर चौकात सापळा रचला.उपस्थित पोलीसांना पाहून टेम्पो चालक अंबाजोगाई शहरात न येता पळून जाण्यासाठी लोखंडी सावरगावकडे वळला. परंतु पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून लोखंडी सावरगावच्या पुढे आडस फाट्यानजीक त्यास गुटख्यासह ताब्यात घेतले. गुटख्याची एकूण किंमत २६ लाख ७० हजार रूपये ऐवढी असल्याचे पोलीसांनी सांगितले. गुटख्याची पोते,ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पोलीसांकडून सुरू आहे.