कापसाची बोंडे खाल्ल्याने कुंबेफळला ३० मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:43 AM2017-12-20T00:43:53+5:302017-12-20T00:43:59+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अंबाजोगाई येथील नारायण बाळू गवळी, किसन अंकुश चौरे, रामचंद्र व्यंकट गायके आणि कुंबेफळ येथील सुधाकर खंडू हेडे या चार मेंढपाळांनी त्यांच्या कळपातील एकूण ६०० मेंढ्या सोमवारी सायंकाळपासून कुंबेफळ येथील तळ्याच्या परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. यातील काही मेंढ्यांनी बोंडअळीच्या प्रादुभार्वामुळे खराब झालेली कापसाची शेतातून उपटून बांधावर टाकलेली बोंडे आणि पाला खाल्ला.
दरम्यान, कुंबेफळ येथील प्रमोद भोसले, सुनील आडसूळ, प्रकाश तोडकर, अंकुश डीवरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मेंढपाळास मदत केली. या मेंढपाळांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचार
मंगळवारी पहाटेपासून एकामागोमाग एक मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू झाले. आतापर्यंत ३० मेंढ्या दगावल्या असून बाकी अत्यवस्थ आहेत. याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे, डॉ. गुट्टे, डॉ. अनिल केंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचार सुरू केले. बाधित मेंंढ्यांचे प्रमाण पाहता आणखी मेंढ्या दगावण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तांदळे यांनी व्यक्त केली.