३०० जण वेटिंगवर, लसी आल्या ८०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:09+5:302021-04-21T04:33:09+5:30
आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चालला असल्याने याला अटकाव आणण्यासाठी प्रशासन मेहनत घेऊन वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देत असले ...
आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चालला असल्याने याला अटकाव आणण्यासाठी प्रशासन मेहनत घेऊन वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देत असले तरी नागरिकांकडून होणारा बेफिकीरपणा वाढतच असल्याने प्रशासन जेरीस आले आहे. त्यातच प्राथमिक केंद्रनिहाय लसीकरण दिले जात आहे. यासाठी गर्दी न करणे, सामाजिक अंतर ठेवणे अशी नियमावली आहे; पण मंगळवारी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात येणार असल्याने सामाजिक अंतर न ठेवता मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती, तर जवळपास तीनशेच्या घरात लोक जमले असताना लसीची संख्या केवळ ८० असल्याने नियमांची ऐशी की तैशी होताना दिसून आली.
पोलीस येताच गर्दी ओसरली
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, लोक ऐकत नसल्याची माहिती मिळताच पोलीस पोहोचल्यानंतर गर्दी कमी झाली. लसींचा तुडवडा असल्याने त्यानुसार लसीकरण केले जात आहे; पण लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने पोलिसांना बोलावून ८० जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. जोगदंड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
===Photopath===
200421\20210420_105004_14.jpg