दुधाची खरवस खाल्ल्याने ३२ जणांना मळमळ, उलटी; २० बालकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:35 PM2021-10-17T20:35:14+5:302021-10-17T22:01:22+5:30
ज्या लोकांना हे दुध देण्यात आले आणि ज्यांनी ते खाल्ले अशा सर्वांनाच उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास सुरू झाला. हा प्रकार समजताच रूग्णांना दिंद्रुड, पात्रुडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
संतोष स्वामी
दिंद्रूड : खरवस दूध खाल्याने जवळपास ३२ जणांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला आहे. यात २० बालकांचा समावेश असून १२ जणांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथे रविवारी रात्री ७ वाजता उघडकीस आला. चोपनवाडी येथील मधुकर पंढरीनाथ वनवे यांच्या म्हसीचे जवळपास १० लिटर कोवळे दूध गावातीलच संपर्कातील व्यक्तींना रविवारी सकाळी वाटण्यात आले होते.
ज्या लोकांना हे दुध देण्यात आले आणि ज्यांनी ते खाल्ले अशा सर्वांनाच उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास सुरू झाला. हा प्रकार समजताच रूग्णांना दिंद्रुड, पात्रुडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात काही बालकांचाही समावेश होता. परंतू जवळपास १२ जणांना अधिक त्रास असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चोपनवाडीचे ग्रामस्थ रमेश वनवे यांनी सांगितले की, हे सर्व खरवस दुध खाल्याने झाले असून आरोग्य विभागाला संपर्क साधणे सुरू आहे. जास्त गंभीर कोणी नसले तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे ते म्हणाले.
आरोग्य यंत्रणा कामाला
चोपनवाडीच्या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांना घटनास्थळी जावून आढावा घेण्याच्या सुचना केल्या. आता आरोग्य यंत्रणा गावात पोहचत असल्याचे सांगण्यात आले.
या लोकांचा समावेश
सोमित्रा वनवे, जनाबाई वनवे, गंगाराम मुंडे, दैवशाला मुंडे, विशाल शिंदे, पल्लवी शिंदे, सना शेख, महेबुब शेख, राणी वनवे, बबन कांदे, संतोष मुंडे, आदित्य अंगद वनवे, अनिकेत अंगद वनवे, समिर शेख, कावेरी मुंडे, राधाबाई जाधवर, करण पडुळे, रोहन पडुळे यांच्यासह जवळपास ३२ जणांचा समावेश आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.