३२ टक्के विद्यार्थ्यांनी अडविली शाळांची संच मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:35+5:302020-12-24T04:29:35+5:30
बीड : जिल्ह्यात जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शासनाच्या सरल पोर्टलवर अपलोड झालेली नसल्याने संच मान्यतेची प्रक्रिया ...
बीड : जिल्ह्यात जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शासनाच्या सरल पोर्टलवर अपलोड झालेली नसल्याने संच मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के अपलोड झाल्याशिवाय शाळांना संच मान्यता मिळणार नसल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आधार नोंदणीचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे मागील नऊ महिन्यांत आधार नोंदणीचे काम गतीने करण्यात विलंब झाला.
लाॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या प्रशासकीय पातळीवरील अडचणींमुळे यावर्षी शाळांच्या संच मान्यतेबाबत निर्णय होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दुसरीकडे संच मान्यता द्यावयाची असली तरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार १०० टक्के अपलोड झालेले नसल्याने ही कार्यवाही मार्चपर्यंत खोळंबणार आहे.
बीड जिल्ह्यात ६ लाख १० हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख १६ हजार ९६७ विद्यार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण सरल पोर्टलवर अपलोड झालेले आहेत. तर १ लाख ९३ हजार १६४ विद्यार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण बाकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आधार अद्यावतीकरण माजलगाव तालुक्यात झाले असून, त्यापाठोपाठ गेवराई आणि पाटोदा तालुक्यात झाले आहे. परळी तालुक्यात मात्र विद्यार्थ्यांचे आधार अद्यावतीकरणाचे काम अत्यंत धीमे असून केवळ ५४ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहेत. विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शिक्षण विभागाने मोहीम आखली आहे.
मुख्याध्यापकांची होतेय दमछाक
शासनाने दिलेल्या प्रणालीवर विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यावर अपलोडिंग होते. मात्र, विद्यार्थी नोंद व अपलोडिंगच्या संख्येत तफावत येणारे विद्यार्थी शोधण्यासाठी मुख्याध्यापकांना द्राविडी प्राणायम करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदीत विद्यार्थी कोठे गेले याचा मेळ लागण्यास शाळा बंद असल्याने अडचणी आहेत. ग्रामीण पालक पावती देतात, पण ओटीपी शोधण्यातही वेळ जात आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १०० टक्के आधार नोंदणीबाबत सर्व शाळा व्यवस्थापनांना सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने पाठपुरावा करत आहोत.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी