राज्यातील ८१ पैकी ३३ औषध निरीक्षक होणार सहायक आयुक्त; आता औषधांची नमुने कोण घेणार?
By सोमनाथ खताळ | Updated: February 17, 2025 12:35 IST2025-02-17T12:34:40+5:302025-02-17T12:35:48+5:30
नवीन भरतीचा प्रश्न ऐरणीवर! राज्यभर केवळ ४८ जणच फिल्डवर राहतील. मग बोगस औषधी तपासणार कोण, हा प्रश्न आहे.

राज्यातील ८१ पैकी ३३ औषध निरीक्षक होणार सहायक आयुक्त; आता औषधांची नमुने कोण घेणार?
बीड : अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून बोगस औषधी वितरणाचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांच्या औषधांची तपासणी करण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या. परंतु याचे नमुने घेण्यासाठी औषध निरीक्षकच अपुरे समाेर आले आहे. सध्या राज्यात २०० पैकी ८१ निरीक्षक कार्यरत आहेत. त्यातील ३३ जणांना आठवडाभरात पदोन्नती मिळून ते सहायक आयुक्त होणार आहेत. त्यामुळे केवळ ४८ जणच फिल्डवर राहतील. मग बोगस औषधी तपासणार कोण, हा प्रश्न आहे. त्यामुळे नवी भरती करणे आवश्यक आहे.
कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेस या कंपनीने ८५ लाख गोळ्यांचा राज्यभरात पुरवठा केला होता. यात अंबाजोगाईसह अनेक ठिकाणची औषधी बोगस आढळली होती. त्यानंतर औषध प्रशासनाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात प्रत्येक शासकीय रुग्णालयातून औषध नमुने घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका निरीक्षकला महिन्याला १० अनौपचारिक नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु यासाठी राज्यात मनुष्यबळच नसल्याचे समोर आले. उपलब्ध असलेल्या निरीक्षकांनाच इतर जिल्ह्यांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे.
मराठवाड्यात राहणार दोनच निरीक्षक
मराठवाड्यात औषध निरीक्षकांची २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सात कार्यरत आहेत. आता यातीलही पाचजण पदोन्नतीने सहायक आयुक्त होणार आहेत, तर सध्या सहायक आयुक्तांची आठ पदे असून, छत्रपती संभाजीनगरमधील झोन १ व २ येथेच कार्यरत आहेत. इतर सहा पदे रिक्त आहेत.
मेडिकलची तपासणी कशी होणार?
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एका निरीक्षकाला महिन्याला १० मेडिकलची तपासणी आणि तीन नमुने घेण्याचे उद्दिष्ट होते. परंतु बोगस औषधीचे प्रकरण समोर आल्यानंतर शासकीय रुग्णालयातील १० नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु ते घेण्यासाठी निरीक्षकच नसल्याचे समाेर आले आहे. मग शासकीयच नव्हे तर खासगी मेडिकलची तपासणी कशी होणार, हा प्रश्न आहे.
शासन भरती कधी करणार?
औषध निरीक्षकांची पदे ही एमपीएससीमार्फत भरली जातात. परंतु मागील काही वर्षांपासून या पदांची भरतीच झालेली नाही. यासंदर्भात औषध प्रशासनाचे सह आयुक्त डी.आर. गहाणे यांना संपर्क केला, परंतु त्यांनी व्यस्त असल्याचा मेसेज पाठविला. त्यामुळे बाजू समजली नाही.
अशी आहे आकडेवारी
पदे - मंजूर - कार्यरत
सहायक आयुक्त - ६७ - २५
औषध निरीक्षक - २०० - ८१