राजीव गांधी अपघात योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:34+5:302021-02-12T04:31:34+5:30

बीड : जिल्ह्यात राजीव गांधी सुरक्षा विमा योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षातील ३४ विद्यार्थ्यांच्या पालकांना ...

34 proposals of Rajiv Gandhi Accident Scheme approved | राजीव गांधी अपघात योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

राजीव गांधी अपघात योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात राजीव गांधी सुरक्षा विमा योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षातील ३४ विद्यार्थ्यांच्या पालकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासाठी लागणारा निधी लवकरच मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात राजीव गांधी सुरक्षा विमा योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत दोन वर्षांत एकाही विद्यार्थ्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान मिळालेले नव्हते. मागील दोन वर्षांत अपघातामुळे १७, पाण्यात बुडून २५, सर्पदंशामुळे १, विजेच्या धक्क्याने ७, डोक्यास मार लागून, स्फोटामुळे तसेच भाजून अशा अन्य कारणांमुळे ६ अशा एकूण ५६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या ५६ विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रस्ताव सानुग्रह अनुदानासाठी आले होते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची समिती या योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान मागणी प्रस्तावावर निर्णय घेते.

या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये ३० प्रस्ताव आले होते. त्यापैकी २५ मंजूर झाले. या विद्यार्थ्यांसाठी १८ लाख ५० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले; परंतु कोविड लाॅकडाऊनमुळे प्रक्रिया राबविण्यास विलंब झाला. परिणामी निधी परत गेला. हा निधी परत मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बैठकीअभावी नवे प्रस्ताव प्रलंबित होते. दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक झाली. या बैठकीत ३४ प्रस्ताव मंजूर करून निकाली काढण्यात आले. त्यामुळे ३४ विद्यार्थ्यांच्या पालकांना सानुग्रह निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

-------

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत जिल्हा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दाखल प्रस्तावांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून ३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. शासनाला मंजूर प्रस्तावाबाबत कळवून यासाठी लागणाऱ्या निधीबाबत मागणी करण्यात येणार आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), जि. प. बीड.

-------

३४ मंजूर प्रस्ताव

२५, ५०००० रुपये लागणारा निधी

----------

१८ डिसेंबर २०२० च्या अंकात लोकमतने ‘२५ विद्यार्थ्यांचे पालक अनुदानाच्या तर २६ पालक जिल्हा बैठकीच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. दरम्यान १० फेब्रुवारी रोजी जिल्हा समितीच्या बैठकीत ३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

----------

Web Title: 34 proposals of Rajiv Gandhi Accident Scheme approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.