पाटोदा तालुक्यात वर्षभरात ३५ हजार कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:42+5:302021-05-21T04:35:42+5:30
कोरोना महामारीने जवळपास दीड वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाचा ...
कोरोना महामारीने जवळपास दीड वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला की नाही याची तत्काळ तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांची कोरोना चाचणी प्रत्येक आरोग्य केंद्रात करण्याची सोय केली. तालुक्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृहाच्या इमारतीमध्ये तीन शासकीय व शहरात दोन खाजगी कोविड हॉस्पिटल सुरु आहेत. तसेच आ. सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट,सावरगावच्या वतीने पारगांव (घुमरा ), डोंगरकिन्ही, अंमळनेर, नायगांव या चार ठिकाणी तसेच कुसळंब येथे ग्रामस्थांच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या नागरिकांना ताप, थकवा, सतत खोकला, घशात खवखव होणे, चव व वास याची जाणीव न होणे, अशी लक्षणे असतील त्या नागरिकांनी तत्काळ आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. तसेच जनतेने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. गर्दीत जाणे टाळावे योग्य अंतराचे पालन करावे, असे आवाहन डॉ. तांदळे यांनी केले आहे.
वर्षभरापूर्वी आढळला होता पहिला रूग्ण
२१ मे २०२० रोजी पाटोदा येथे कोविडचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर कोविड प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. २० मे २०२१ पर्यंत ३५ हजार संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. उपचारादरम्यान तालुक्यातील ६९ रूग्णांचे मृत्यू तालुक्याच्या बाहेरील कोविड हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. तालुक्याचा कोरोना मृत्यूदर १.९ टक्के असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे यांनी दिली.