३५१ छावण्यांवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:06 AM2019-04-24T00:06:19+5:302019-04-24T00:06:54+5:30
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले.
बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३५१ चारा छावण्यांना नोटीस देण्यात आली असून ८ दिवसांत योग्य खुलासा न दिल्यास चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने मोर्चा आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वळवला आहे. छावण्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमनूक करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. तर काही ठिकाणी अधिकारी चिरीमिरी घेऊन योग्य तपासणी करत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकारी स्वत: लक्ष घालून चारा छावण्यांची तपासणी करणार आहेत. नियमांनूसार छावणीवर व्यवस्था करण्यात आलेली नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनावरांची संख्या कमी असताना जास्तीचा अहवाल पाठवणे, एक दिवसाआड पशुखाद्याचे वाटप न करणे, योग्य नोंदी नसणे, जनावरांवर नंबर नसणे यासह इतर त्रूटी आढळून आल्यामुळे ३५१ चारा छावणी चालकांना नोटीस दिली आहे. तसेच ८ दिवसांमध्ये योग्य खुलासा न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
पदाधिकाऱ्यांच्या छावण्यांना अधिकाऱ्यांकडून अभय
चारा छावण्यांचे चालक हे बहूतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाºयांकडून कार्यवाही केली जात नाही.
अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी काही दिवसांपुर्वी म्हाळस जवळा, मांजरसुंबा, आष्टी, शिरुर, येथील काही चारा छावण्यांची तपासणी केली होती. त्यावेळी जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. मात्र, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे पदाधिका-यांच्या छावण्यांना वेगळा नियम प्रशासकीय अधिकाºयांनी लावला आहे का असा प्रश्न इतर चारा छावणी चालक विचारु लागले आहेत.
तहसीलदारांचा अजब फतवा
शिरुरच्या तहसीलदारांनी आदेश काढून तलाठ्यांनी चारा छावण्या तपासायच्या नाहीत असा अजब फतवा काढला होता.
त्यांनी काही चारा छावण्याची तपासणी केली तेथे सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. तर त्याच छावणीची अपर जिल्हाधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर १५६ पेक्षा अधिक जनावरांची तफावत दिसून आली.
त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाºयांना छावण्यांमधून भ्रष्टाचाराचे कुरण मिळाले आहे.