सव्वाचार लाख रुग्णांसाठी ३६ डॉक्टर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:32 AM2018-08-02T00:32:36+5:302018-08-02T00:34:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आमच्यावर वेळेवर व दर्जेदार उपचार होत नाहीत, अशी ओरड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून नेहमीच ऐकावयास मिळते. वरिष्ठांपर्यंत अनेकवेळा तक्रारीही केल्या जातात. हाच धागा पकडून बुधवारी ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील आढावा घेतला असता केवळ ३६ डॉक्टर वर्षभरात तब्बल ४ लाख १९ हजार २२४ रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग मात्र डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास उदासिन असल्याचे दिसून येते.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आहे. जास्तीत जास्त रुग्ण हे सर्वसामान्य कुटुंब आणि ग्रामीण भागातील असतात. आलेल्या रुग्णांवर तात्काळ आणि दर्जेदार उपचार करा, असे आदेश सर्व डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिलेले आहेत.
असे असले तरी काही कामचुकार डॉक्टरांकडून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु काही डॉक्टर मात्र प्रामाणिक सेवा देऊन रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करीत असल्याचेही अनेक उदाहरणे आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हलगर्जीपणा झाल्याचे आरोप करण्यात आले. तसेच रुग्ण व डॉक्टरांमध्ये वादही झाले. काही दिवसांपूर्वीच अतिदक्षता विभागात उपचार करण्यावरून ब्रदर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये मारामारी झाली होती. यामुळे जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली होती.
असे असले तरी काही डॉक्टरांच्या प्रामाणिक सेवेमुळे जिल्हा रुग्णालय अनेक गोष्टींमध्ये राज्यात अव्वल ठरले आहे. सिझर, प्रसुती, शस्त्रक्रिया आदींचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आय. व्ही. शिंदे, डॉ. सतिष हरिदास हे यावर नेहमी लक्ष ठेवून असतात.
काही विभागांत वाढला ताण
जिल्हा रुग्णालयात वर्ग २ ची ३६ डॉक्टर आहेत. असे असले तरी फिजिशियन, बाल, प्रसुती, आॅर्थो, शस्त्रक्रिया या विभागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. येथे अपुरे मनुष्यबळ असल्याने या विभागातील डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतो.
...म्हणून जमिनीवर घ्यावे लागतात उपचार
३२० खाटांचे जिल्हा रुग्णालय असून प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही खाटांपेक्षा दीडपट आहे. दररोज ४५० ते ५०० रुग्ण अंतरुग्णविभागात उपचार घेत असतात. खाट नसल्याने त्यांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त होतो. मागील वर्षात १ लाख ७१ हजार ६२५ रुग्णांनी अंतरुग्ण विभागात उपचार घेतले आहेत.
१५ हजार शस्त्रक्रिया
मागील वर्षात १० हजार २८९ साध्या तर ५ हजार ९९८ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रीया जिल्हा रुग्णालयात झाल्या आहेत. अपुºया सुविधा आणि साहित्य उपलब्ध नसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत शस्त्रक्रियांचा आकडा घटला आहे.
परिचारिकांसोबत वाढले वाद
तीन रुग्णांसाठी एक परिचारिका असावी, असा नियम आहे. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात १२१ परिचारीका कार्यरत आहेत. परंतु रुग्ण संख्या दुप्पट असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढतो. अनेकवेळा रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना त्यांच्या रोषाचा बळी व्हावे लागते. यामुळे अनेकवेळा वादही झाले आहेत.
वर्ग १ ची १८ पदे रिक्त
जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पदे असून पैकी १८ रिक्त आहेत. यामध्ये केवळ जिल्हा शल्य चिकित्सक व त्वचारोग तज्ज्ञ यांचीच पदे भरलेली आहेत. वर्ग १ ची पदे रिक्त असल्याने वर्ग २ च्या अधिकाºयांना विभाग प्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे. उपचाराबरोबर विभागप्रमुखाची जबाबदारी सांभाळताना त्यांना अनंत अडचणी येत आहेत.