३६ हजार विद्यार्थ्यांची जिज्ञासा कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:18 AM2019-05-01T01:18:32+5:302019-05-01T01:18:44+5:30
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ४४ हजार ५४४ पैकी ३६ हजार २१८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देत जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक आणि पालकांकडून कौतुकाची थाप मिळविली.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेत २०० गुणांची प्रश्नपत्रिका होती. सकाळी व दुपारी अशा दोन टप्प्यात ही परीक्षा पार पडली. ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे.
नियमित परीक्षा दिल्यानंतर काही मुले बाहेरगावी निघून गेले. आपला विद्यार्थी या कसोटीपासून वंचित राहू नये म्हणून शिक्षकांनी संपर्क मोहीम हाती घेतली. परीक्षेच्या अगोदर शिक्षकांना या कसोटीला सामोरे जावे लागले. शंभर टक्के उपस्थिती गरजेची असताना परीक्षेचा कालावधी नेमका गडबडीचा लागल्याने काही मुलांना यापासून वंचित रहावे लागले. होता होईल तेवढे प्रयत्न शिक्षकांनी केले तरी संपर्क न झालेले विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे शिरुर, केज, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, परळी, पाटोदा, माजलगाव, धारुर, वडवणीसह बीड तालुक्यातील वार्ताहरांनी कळविले. दरम्यान भविष्यातील स्पर्धा परीक्षांची जाणीव व्हावी यासाठी प्रात्यक्षिक म्हणून ही जिज्ञासा कसोटी चांगली आहे. आज चांगला सहभाग दिसून आल्याचे शिरुरचे गटशिक्षणाधिकारी शेख जमीर यांनी सांगितले. नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी केंद्रांची पाहणी केली. काही शिक्षकांनी नकारात्मकता दाखविली तरी मोठ्या संख्येने परीक्षा देत विद्यार्थ्यांनी कसोटी यशस्वी केली.
सर्व शाळांतील चौथी व सातवी वर्गाच्या शिक्षकांनी मुलांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत आणण्याचे व परत घरी पोहचविण्यासाठी शिक्षक- शिक्षिकांनी कर्तव्य बजावले. परीक्षा केंद्रांवर थंड पाण्याची तसेच खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती.
काही केंद्रांवर परीक्षा व्यवस्थेतील शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना बिस्किटे, उर्जावर्धक पेयांची तसेच मंडपाची व्यवस्था केली.आरोग्य विभागाचे कर्मचारी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहिले होते.
१३ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास
केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रावर परिक्षा देण्यास आलेल्या १२ विद्यार्थ्यांना उन्हामूळे दुपारच्या परीक्षेदरम्यान उलटी, चक्कर व ताप चढल्याचा प्रकार घडला. केंद्र संचालक शिवाजी काळे यांनी तात्काळ विडा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी केंद्रावर येऊन मुलांवर उपचार केले. वडवणीतही एका मुलीला त्रास होत असल्याने तत्काळ उपचार केले. हा अपवाद वगळता परीक्षा सुरळीत पार पडली.