नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान अनुदानाचे ३८३ कोटी जमा, २३९ बाकी
By शिरीष शिंदे | Published: September 27, 2023 07:14 PM2023-09-27T19:14:09+5:302023-09-27T19:14:43+5:30
ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होतेय जमा
बीड : मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल २०२३मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयाद्वारे ८ लाख १४ हजार ३६ शेतकऱ्यांना ६२२ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी अनुदान ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून, २३९ कोटी रुपये बाकी आहेत. शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.
पूर्वी जिल्हा स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात असे, परंतु यावर्षीपासून राज्य स्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात; परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने ई-केवायसी असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ७८ हजार ३६४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३८३ कोटी ५ लाख रुपये अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.
व्हिके लिस्ट तलाठ्यांकडे उपलब्ध
व्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादी नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्ती अनुदान स्थिती
कालावधी-बाधित शेतकरी-नुकसान रक्कम (कोटीत)-खात्यावर जमा रक्कम
अतिवृष्टी २०२२-३५१६३४-४१०.२२-२८७.५५
सततचा पाऊस २०२२-४३७६८८-१९५.०३-८९.६१
अवकाळी पाऊस मार्च २०२३-८५०३-५.९९-१.८०
अवकाळी पाऊस एप्रिल २०२३-१६२११-११.३२-४.०९
एकूण-८१४०३६-६२२.५८-३८३.०५
देर आये दुरुस्त आये
मागच्या वर्षी शासनाने जीआर काढून मंजूर केलेली अनुदानाची रक्कम आत बँक खात्यावर जमा केली जात आहे. वास्तविकत: ही मदत शासनाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने उशिरा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मागच्या तीन महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. अशी बिकट स्थिती असताना अनुदानाची रक्कम अनेकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अद्याप निम्मी रक्कम जमा होणे बाकी आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर जमा होईल. यासोबतच किती रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे हे सुद्धा समजून येईल. ई-केवायसीमुळे किती रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे याचा उलगडा होईल.