संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:54 IST2025-04-12T11:51:49+5:302025-04-12T11:54:43+5:30
सरपंच संतोष देशमुख यांच्या शरिरावर १५० जखमा आढळून आल्या होत्या.

संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, असा परीक्षण अहवालात उल्लेख करण्यात आला. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला, ज्यात गॅसचा पाईप, पाईपचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपचा समावेश आहे. या हत्यारांनी मारहाण झाली तर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, आरोपींनी याआधी देखील इतर व्यक्तींना मारहाण करण्यासाठी याच हत्यारांचा वापर केल्याचे समजत आहे. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे, जो संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतो.
याप्रकरणात आठ जणांना अटक
याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांमध्ये सीआयडीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडने बीड न्यायालयात आरोपातून मुक्तता मिळावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. कराड यांच्याविरोधात कोणतेही प्राथमिक पुरावे नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून उत्तर मागितले आहे.
नेमके प्रकरण काय?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात देखील हा उल्लेख आहे. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे दिसून आले.