बीडमध्ये चोर-पोलिसांचा ४ तास लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:52 PM2018-06-07T23:52:34+5:302018-06-07T23:52:34+5:30
एरव्ही आपण चोर-पोलिसांची गोष्ट सांगत असतो. चोर पुढे, पोलीस मागे धावत असतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. चक्क एटीएमसह रोख सात लाख रुपये चोरुन पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते गुरुवारी पहाटे ६ वाजेपर्यंत असा चार तास चोर - पोलिसांचा खेळ रंगला. यामध्ये पोलिसांनी बाजी मारत तीन चोरांच्या मुसक्या आवळल्या.
बीड : एरव्ही आपण चोर-पोलिसांची गोष्ट सांगत असतो. चोर पुढे, पोलीस मागे धावत असतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. चक्क एटीएमसह रोख सात लाख रुपये चोरुन पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते गुरुवारी पहाटे ६ वाजेपर्यंत असा चार तास चोर - पोलिसांचा खेळ रंगला. यामध्ये पोलिसांनी बाजी मारत तीन चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ही कारवाई सिने-स्टाईलने केली.
विशाल पारीखराव राख (२०, रा. थेरला), बाळू भागवत मुंडे (२३, रा. खालापुरी), श्रावण गणपत पवार (रा. राजुरी) अशी पकडलेल्या चोरांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बुधवारी जिल्ह्यात आॅल - आऊट आॅपरेशन राबविले होते. रस्त्यारस्त्यावर पोलीस दिसत होते. रात्री २ वाजता बीड शहरातील राजीव गांधी चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये सुरुवातीला चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फेकण्यात आला. यादरम्यान गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी येत असल्याचे पाहताच चोरांनी तेथून पोबारा करीत जवळच उभ्या असलेल्या जीपजवळ गेले. गस्तीवरील उजगरे व सानप हे दोघे नोंदणी करण्यासाठी एटीएममध्ये गेले. याचवेळी त्यांना कॅमेºयावर मारलेल्या स्प्रेचा वास आला.
बाहेर आल्यानंतर त्यांना जीप (एमएच १२ ईएम ५९२७) दिसली. जीपच्या दिशेने जाताच चोरट्यांनी जीपसह धूम ठोकली. कर्मचाºयांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जीपचा पाठलाग गेला. तोपर्यंत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणेप्रमुखांना याची माहिती दिली.
चोरटे ज्या दिशेने गेले त्याच दिशेने मुर्शदपूर येथे बीड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यांना ही माहिती मिळताच ते राजुरीच्या दिशेने रवाना झाले. तोपर्यंत चोरटे राजुरीत पोहचून एसबीआय बँकेचे एटीएम गॅसकटरने कापून जीपमध्ये टाकत होते. याचवेळी ग्रामीण ठाण्याचे गाडी चालक रशीद खान यांनी या जीपला समोरुन धडक दिली. पोलीस आल्याचे समजताच चोरांनी हातातील टांबी पोलिसांच्या दिशेने भिरकावली.
अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. एएसआय दिनकर येकाळ, गणपत लोणके, मनोहर भुतेकर यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आले. ही माहिती समजताच कलुबर्मे, खिरडकर हे राजुरीत पोहोचले. शिरुर, पाटोदा ठाण्यांना कळविले तसेच स्था. गु. शा. चे पो.नि. घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे गजानन जाधव, दिलीप तेजनकर यांनाही घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनी तात्काळ आपले पथक चोरांच्या शोधात पाठवले. रात्रभर शोधाशोधीनंतर पहाटे हिवरसिंगा येथील डोंगरात पाळवदे यांच्या पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. दुपारी आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या. राजुरीतील घटनेची बीड ग्रामीण, तर बीडमधील घटनेची शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली आहे. शिवाजीनगरचे पो.नि. शिवलाल पुर्भे, शिरुरचे सपोनि महेश टाक, आरसीपीचे जवान, बीड ग्रामीणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.
हे साहित्य केले जप्त
कारवाईत पोलिसांनी जीप, हातोडा, गॅस कटर, गॅस सिलिंडर, काठ्या, टांबी, चोरीच्या बॅटºया आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच त्यांच्याकडून एटीएम ताब्यात घेतले आहे. त्यातील सात लाख रुपयांची रक्कमही सुरक्षित असल्याचे उप अधीक्षक खिरडकर यांनी सांगितले.
दोघांचा शोध सुरु
घटनेत पाच चोरांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पैकी तिघांना बेड्या ठोकल्या असून, दोघांचा शोध घेतला जात आहे. यासाठी विशेष पथके रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
खालापुरीतील चोरीशी संबंध असल्याचा अंदाज
काही दिवसांपूर्वीच शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी येथे ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात हेच चोरटे सहभागी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यातील एक आरोपी हा खालापुरी येथील असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
राजुरीतील आरोपीला होती माहिती
घटनेतील पाचपैकी श्रावण पवार हा राजुरी येथील आहे. त्याला एटीएमबद्दल सर्व माहिती होती. बीडमधील एटीएम फोडल्यानंतर राजुरीतील एटीएम लंपास करण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र, दुर्दैवाने बीड आणि राजुरीमधील प्लॅन फसले.