अनेकांनी प्रॉपर्टी हडप करुनही भगवानगडाकडे ४०० एकर जमीन: महंत नामदेव शास्त्री
By अनिल लगड | Published: September 12, 2022 01:44 PM2022-09-12T13:44:16+5:302022-09-12T13:47:02+5:30
भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली.
बीड : संत भगवानबाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या सहकार्याने भगवानगडाचा विकास सुरू आहे. मागील काळात औरंगाबाद येथील भगवानगडाची प्रॉपर्टी काहींनी हडप केली. परंतु भाविकांची अपार श्रध्दा, त्यांनी केलेली मदत व सहकार्यामुळे भगवानगडाला काही फरक पडला नाही. आजही भगवान गडाकडे ३५० ते ४०० एकर जमीन शिल्लक आहे, असे वक्तव्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी महंत शास्त्री यांची ग्रामस्थांनी रथातून मिरवणूक काढली होती. यावेळी महंत शास्त्री बोलत होते.संत भगवान बाबा चकलंब्यात घोड्याच्या तांग्यानी यायचे आणि चकलांब्यातून पुढे बसने जायचे. भगवान बाबांच्या इतक्या जवळचे गाव मधल्या काही काळात थोडे दूर झाले होते. पण आज तो सर्व दुरावा तुम्ही गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन भरून काढला, असे बोलून महंत शास्त्रींनी तरुणांसह गावकऱ्यांचे कौतुक केले.
संत भगवानबाबांचे औरंगाबाद येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासू सहकारी होते. आज ते हयात नाहीत. त्यांच्यावर इतका विश्वास होता की, ते शिकत असताना त्यांनी बाबांना घड्याळ मागितले होते. यावेळी भगवानबाबांनी स्वत:च्या हातातील घड्याळ लगेच काढून त्यांना दिले होते. यानंतर ‘ते’ सहकारी गडाचे विश्वस्त झाले. भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली. तरीही गडाला काहीही फरक पडला नाही. आजही गडाकडे भरपूर जमीन शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जागाही हडपण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला होता. परंतु तो प्रयत्न तेथील भाविकांनी हाणून पाडला, असेही महंत शास्त्री यांनी यावेळी सांगितले. भगवान गडावर अशी अनेक संकटे आली. तरी ती बाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या मदत व सहकार्याने ती दूर झाली. यामुळे आजही भगवानगडाची विकासाकडे वाटचाल आहे, असेही शास्त्री म्हणाले.
गरज पडेल तेव्हा चकलांब्याचा निधी घेईल
भगवान गडाच्या विकास कामासाठी चकलांबा ग्रामस्थांची विकास निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नामदेव शास्त्री यांनी सांगितले की, आता नको. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस घेईल, असे सांगितले.