बोगस रॉयल्टी दाखवून केला ४ हजार ब्रास मुरूम उपसा; व्हायरल व्हिडीओनंतरही कारवाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 03:34 PM2022-08-26T15:34:15+5:302022-08-26T15:34:26+5:30
सदरील ठिकाणचा व तलाठी यांनी भेट दिलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
माजलगाव ( बीड): पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने मागील सहा महिन्यापासून मुरूमासाठी रॉयल्टी देणे बंद आहे. मात्र, एका व्यक्तीने बोगस रॉयल्टी दाखवून तालखेड परिसरातून जवळपास चार हजार ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केले आहे. त्याचबरोबर एका शेतातून देखील मुरूम घेऊन जात असताना शेतकऱ्यांनी जेसीबी, ट्रॅक्टर पकडले. याची माहिती महसूल विभागाला देऊन तीन दिवस उलटले तरी कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील गट नंबर 500 मधून मागील अनेक दिवसापासून मुरुमाची बोगस रॉयल्टी दाखवत मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु आहे. मुरूम माफियांनी आप्पासाहेब नानाभाऊ वरपे यांच्या अर्ध्या एकर शेतामधून देखील मुरूम उत्खनन करू लागले. ही माहिती कळताच शेतकऱ्याने जेसीबी व ट्रॅक्टर पकडले होते. याबाबत महसूल विभागाला माहिती दिली. त्यानंतर तलाठ्याने येऊन फक्त पाहणी केली. पंचनामा करू नये असे तहसीलदार यांनी सांगितल्याचे तलाठ्याने म्हटले. यादरम्यान माफियांनी ट्रॅक्टर फरार केले. तर तीन दिवसांपासून जेसीबी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. परंतु, तीन दिवस उलटून देखील महसूल विभागाने यावर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही.
व्हिडिओ व्हायरल तरी कारवाई नाही
सदरील ठिकाणचा व तलाठी यांनी भेट दिलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंरही महसूल विभागाने काहीच कारवाई केली नाही. दोन ओळीचे पत्र लिहून द्या, सदरील जेसीबीचा फोटो काढा असे शेतकरी सांगत असताना तलाठी उद्धट भाषा वापरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत येथील तहसीलदार वर्षा मनाळे यांना विचारणा केली असता, त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न करत केले. काल बीड येथे मिटींग होती. आज सुट्टी असताना देखील आम्ही पंचनामा करण्यास पाठवले आहे अशी माहिती दिली.