महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:57 PM2020-11-20T18:57:53+5:302020-11-20T18:59:58+5:30
१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे
बीड : शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे, राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आली होती; परंतु बीड जिल्ह्यात याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ७ हजार २३५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पैसे भरूनही अद्याप ४ हजार ५५ शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.
कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने कामे रखडली
१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे; परंतु या कंपन्यांना कसलेच उद्दिष्ट दिलेले नाही. या कपंन्यांवर महावितरणचे नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असतानाही वरिष्ठांकडू ते निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सोलार पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ७२३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १९७ विविध त्रुटींमुळे रद्द केले आहेत. २९८३ पंपांचे काम पूर्ण झालेले आहे. राहिलेले पंप बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे ते बसविण्यास वेळ लागला. १३ कंपन्या हे काम करीत आहेत.
-रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड