५४ पैकी ४२ आरोग्य केंद्रे धोक्याची; अग्निसुरक्षेबाबत गाफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:45+5:302021-01-16T04:37:45+5:30
बीड : जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रातही रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५४ पैकी केवळ ...
बीड : जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रातही रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५४ पैकी केवळ १२ केंद्रांचे ऑडिट झाले असून, इतर ४२ केंद्रांत धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक म्हणजे एकाही आरोग्य केंद्राकडे अग्निशमन विभागाची एनओसी नसल्याचे उघड झाले आहे.
भंडारा येथील शिशू गृहातील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्याच अनुषंगाने शहरी व ग्रामीण आरोग्य संस्थांचा आढावा घेतला असता केवळ बोटावर मोजण्याइतक्याच संस्थांनी फायर ऑडिट केल्याचे समाेर आले. ऑडिट तर दुरच परंतु त्यांच्याकडे अग्निशमन विभागाची एनओसीही नसल्याचे समोर आले आहे. यावरून आरोग्य विभाग रुग्ण व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाइकांच्या सुरेक्षेबाबत गाफील होता, हे उघड झाले आहे. आतातरी या उपाययोजना करून सर्व सुरक्षा करण्याची गरज आहे.
या केंद्रांनी केले ऑडिट
जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांनी ऑडिट केले आहे. यात आडस, बनसारोळा, चिंचोलीमाळी, राजेगाव, वीडा, युसूफवडगाव, भोगलवाडी, मोहखेड, अंमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव, वाहली यांचा समावेश येतो. यांनी ऑडिट केले असले तरी त्यांच्याकडे एनओसी नाही, हे देखील खरे आहे.
लागेल आग, तेव्हा येईल जाग
मागील पाच वर्षांत एकाही आरोग्य केंद्रात आगीची घटना सुदैवाने घडलेली नाही. असे असले तरी घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाला नेहमी आग लागल्यावरच जाग येते. त्यामुळे आताच याची काळजी घेणे गरजेचे आहे.
१८ केंद्रांत अग्निरोधक यंत्रांचा अभाव
आरोग्य केंद्रात आगीची घटना घडली तरी प्राथमिक उपाय म्हणून अग्निरोधक यंत्रही नसल्याचे समोर आले आहे. यात कडा, शिरूर, खालापुरी, टाकळसिंग, निपाणीजवळका, सीडी अंबाजोगाई, खडकपुरा, सादोळा, गंगामसला, पात्रूड, किट्टीआडगाव, टाकरवण, धर्मापुरी, मोहा, नागापूर, सिरसाळा, पोहनेर, नाथ्रा या १८ आरोग्य केंद्रात हे यंत्र नाही.
कोट -
भंडारा दुर्घटनेनंतर सर्वच माहिती मागविली आहे. अनेक संस्थांत ऑडिट झाले नाही, हे खरे आहे. ते तत्काळ करून घेतले जात आहे. तसेच रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच उपाययोजना केल्या जातील. त्या दृष्टीने नियोजन केले जात असून, लवकरच पूर्ण होईल.
डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.