पक्षांच्या १० उमेदवारांसह ४३ अपक्षांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:51 PM2019-03-28T23:51:30+5:302019-03-28T23:51:37+5:30
देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
बीड : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नेहमी चर्चेची राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम होती. १९ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली.
या निवडणुकीत भाजपा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, हम भारतीय पार्टी, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, महाराष्टÑ क्रांतीसेना, दलित, शोषित, पिछडा वर्ग अधिकार दल, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, समाजवादी पार्टी आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अशा १० पक्षांकडून उमेदवारी दाखल झाली आहे. तर ४३ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन आम्ही पण मैदानात उतरल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे अपक्षांची भाऊगर्दी झाली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये एका माजी आमदाराचाही समावेश आहे.
निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचे अर्ज आल्याने सामान्य मतदारांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.
वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांच्या यादीतील अनेक अपक्ष उमेदवार हे या आधीच्या अनेक निवडणुकीत आपले भविष्य अजमावणारे आहेत. त्यामुळे अशा हौसी उमेदवारांची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ४३ पैकी बहुतांश उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. काहींनी प्रचारही सुरू केला असून, आपली उमेदवारी किती महत्वाची आहे हे पटवून देत आहेत. या निवडणुकीत किती अपक्ष उमेदवार रिंगणात तग धरुन राहतात आणि किती माघार घेतात, हे पाहणे शुक्रवारी औत्सुक्याचे ठरणार आहे.
आज अंतिम यादी होणार : कोण घेणार उमेदवारी मागे ?
होळी आणि धूरवडीमुळे अनेकांनी मुहूर्त टाळला. रंगपंचमीपासून रणसंग्रामाला सुरुवात झाली. २६ मार्चपर्यंत ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. २७ मार्च रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी झाली.
या छानणीत ५३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले तर ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
त्यामुळे हौसेने अर्ज भरलेले किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात? हे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होईल.