शिरापूर येथे दगावल्या ४३६ कोंबड्या ; आष्टी तालुक्यातील घटना, पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:45+5:302021-01-14T04:27:45+5:30
नितीन कांबळे कडा- पाटोदा तालुक्यापाठोपाठ आष्टी तालुक्यातदेखील बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. मंगळवारी सायंकाळी शिरापूर येथे परसातील ४३६ ...
नितीन कांबळे
कडा- पाटोदा तालुक्यापाठोपाठ आष्टी तालुक्यातदेखील बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. मंगळवारी सायंकाळी शिरापूर येथे परसातील ४३६ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने याची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. पण या कोंबड्यांचा मुत्यू नेमका कशाने झाला, हे अहवाल आल्यावरच निदान होईल, असे पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी लोकमतला सांगितले.
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील चव्हाण व तागड वस्तीवर मंगळवारी सायंकाळी अचानक सात शेतकऱ्यांच्या परसातील ४३६ कोंबड्या दगावल्या. हा प्रकार पशुसंवर्धन विभागाला समजताच बुधवारी सकाळी अधिकारी गावात दाखल झाले. तोवर मेलेल्या कोंबड्या गोण्यात घालून फेकून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक मृत व तीन घायाळ असे चार कोंबड्या त्यांनी घेऊन त्याचा पंचनामा केला. आजाराचे निदान करण्यासाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल येताच निदान होईल. शेतकऱ्यांनी काळजी घेऊन पक्षी व कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास त्वरित पशुसंर्वधन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी केले.
यांच्या परसातील दगावल्या कोंबड्या
बाबासाहेब चव्हाण, किरण तागड, भाऊसाहेब चव्हाण, झुंबर चव्हाण, पोपट तागड, संतोष तागड अशा सात शेतकऱ्यांच्या ४३६ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्या आहेत.